योगेश पांडेनागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवर भरदिवसा कोळसा व्यापाऱ्याकडील कर्मचाऱ्याची बॅग हिसकावत ९ लाख रुपये लुटल्याची घटना घडली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छापरूनगर येथे ही घटना घडली असून यामुळे पोलीसदलासह व्यापाऱ्यांमध्येदेखील खळबळ उडाली आहे.
सीए असलेले एन.के. अग्रवाल यांची खासगी फर्म असून ते कोळशाचाही व्यवहार करतो. वैष्णादेवी चौकात त्यांचे कार्यालय आहे. अनिल परसराम नागोत्रा(३२,धनगवळी नगर) हा अग्रवाल यांच्या फर्ममध्ये काम करतो. फर्मचे बॅंकेचे व्यवहार तोच सांभाळतो. त्यांच्या फर्मचे छापरूनगर चौकातील ॲक्सिस बॅंकेत खाते आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजता अनिल बँकेतून पैसे काढण्यासाठी गेला. त्याने नऊ लाख रुपये काढले व ती रोख एका बॅगेत ठेवली. त्यानंतर तो मोटारसायकवरून कार्यालयाकडे निघाला. मोटारसायकलच्या टाकीवर त्याने बॅग ठेवली होती. छापरूनगर चौकाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अनिलला धक्का मारला. त्यात त्याचे संतुलन बिघडले व तो दुचाकीसह खाली पडला. चोरट्यांनी त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला व सुसाट्याने दुचाकीवरून निघून गेले. अनिलने अग्रवाल यांना या घटनेची माहिती दिली व लकडगंज पोलीस ठाणे गाठले. या प्रकाराची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन, उपायुक्त गोरख भामरे घटनास्थळी पोहोचले .संशयाच्या आधारे लकडगंज पोलीस ठाण्यातील पथकाने दोन संशयित ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
पोलिसांची सीसीटीव्हीवर भिस्तपोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात लुटारू दिसत होते. पोलिसांनी बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजचीदेखील तपासमी केली व त्यात एक संशयितही आढळून आला. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून लुटारूंचा शोध घेत आहेत. सोबतच अनिलचीदेखील चौकशी करण्यात येत आहे.
व्यापाऱ्यांमध्ये दहशतसेंट्रल एव्हेन्यूवर मोठ्या प्रमाणात व्यापारी आस्थापना असून अनेकांचे दररोज लाखोंचे रोख रकमेचे व्यवहार होतात. तेथील बॅकांमध्ये कर्मचारी नियमितपणे मोठी रोख घेऊन जात असतात. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.