नागपूर : रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या सात तस्करांना रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) जेरबंद केले. यात दोन महिला तस्करांचाही समावेश असून, त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
येथील रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी ३.१५ वाजता गाडी क्रमांक २०८०५ विशाखापट्टणम - नवी दिल्ली एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर आली. बी-१ कोचमध्ये तपासणी करणाऱ्या आरपीएफ जवानांना अमली पदार्थांचा उग्र दर्प आला. त्यामुळे त्यांनी त्या डब्यातील काही प्रवाशांची चौकशी केली. ते दाद देत नसल्याने त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात गांजा आढळला. त्यानंतर या प्रवाशांनी आपले काही साथीदार कोच नंबर एस ५ मध्येही असल्याचे सांगितले. परिणामी आरपीएफ जवानांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यात ९० किलो गांजा आढळला.
दरम्यान, ही चौकशी आणि तपासणी सुरू असतानाच रेल्वेची थांबण्याची वेळ संपल्यामुळे ती पुढच्या प्रवासाला निघाली. दुसरीकडे गाडीत आणखी काही डब्यात गांजा असल्याचा संशय असल्यामुळे आरपीएफचे जवान या गाडीत बसले आणि त्यांनी या गाडीची इटारसीपर्यंत तपासणी केली. दरम्यान, नागपूर स्थानकावर ताब्यात घेण्यात आलेल्या पाच पुरुष आणि दोन महिला अशा सातजणांकडे ९० किलो गांजा आढळला. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत नऊ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. पुढील तपास सुरू आहे.