लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारूच्या व्यसनामुळे अन्ननलिकेचा कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दीर्घ कालावधीच्या अॅसिडिटीमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. या कॅन्सरमध्ये अन्ननलिका दोन ते तीन सेंटीमीटरने अरुंद झाली तरी त्याचा त्रास जाणवत नाही. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष होते. त्रास वाढल्यावरच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. यामुळे साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली.मिडास मेडिकल फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्यावतीने जठराच्या आजारावर ‘जीपीकॉन-२०२०’चे शुक्रवार २४ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे; याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. प्रशांत देशमुख व डॉ. सौरभ मुकेवार उपस्थित होते.डॉ. मुकेवार म्हणाले, या परिषदेत अॅसिडिटी, डायरिया, यकृताचा आजार, ‘हेपेटायटिस-बी’ आदी आजारांच्या संदर्भातील अद्ययावत माहिती, नव्या उपचार पद्धतीवर चर्चासत्र, नव्या एण्डोस्कोपीच्या वापरातून आजाराचे निदान व उपचार, याशिवाय ‘कॉलीन जोस्कोपी’च्या मदतीने उपचार यावर प्रकाश टाकला जाणार आहे. परिषदेत डॉ. कुलविंदर दुवा, डॉ. सौरभ मुकेवार, डॉ. नरेश भट, डॉ. अजय दुसेजा, डॉ. रुपरॉय हे विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. अजिनो मोटोमुळेही होऊ शकतो कॅन्सर‘अजिनो मोटो’च्या (मोनोसोडियम ग्लुटामेट) वापरामुळे पदार्थांची चव वाढत असली तरी याचे खूप वाईट परिणाम शरीरावर होतात. विशेषत: अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. गिळायला त्रास होणे, छातीत दुखणे, घास खाली घालण्यासाठी घासानंतर पाणी पिणे आवश्यक ठरणे, पुढे पुढे पाणी पितानाही अडकल्याचा त्रास जाणवणे व पाठीत दुखणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. हा कॅन्सर टाळण्यासाठी रोजच्या आहारात भाज्या, फळे, झिंकचे प्रमाण वाढवायला हवे, असा सल्लाही डॉ. मुकेवार यांनी दिला.अॅसिडिटीवर स्वत:हून औषधे घेणे टाळावेएका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. मुकेवार म्हणाले, अॅसिडिटी हा सामान्य आजार असला तरी यावर स्वत:हून औषधे घेऊ नये. वारंवार स्वत:हून औषधे घेतल्यास अतिसार, न्यूमोनिया होण्याचा धोका होऊ असू शकतो. यासोबतच मूत्रपिंडाचे आजार, डिमेन्शिया, हृदयविकाराचे आजारही होऊ शकतात. परंतु यासंदर्भातील पुरावे अद्यापही अपुरे आहेत.
९० टक्के अन्ननलिकेच्या कॅन्सरचे उशिरा निदान : श्रीकांत मुकेवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 10:58 PM
साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली.
ठळक मुद्दे‘जीपीकॉन-२०२०’ परिषद शुक्रवारपासून