नागपूर : विविध चालीरिती, प्रथा-परंपरेनुसार विवाह उत्साहात व धुमधडाक्यात साजरे होत असले तरी विवाह नोंदणीकडे नवदाम्पत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे. शहरात वर्षाला होणाऱ्या विवाहाची संख्या आणि विवाह नोंदणीची परिस्थिती बघितल्यास केवळ १० टक्के नोंदणी होत असल्याचे दिसते आहे.
विवाहाचा अधिकृत शासकीय पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु नवदाम्पत्यांची विवाह नोंदणीबाबत भूमिका उदासीन आहे. शहरात महिन्याकाठी हजारो शुभमंगल लागत असताना महापालिकेच्या झोनमध्ये महिन्याला शेकडो विवाह नोंदणी होतात. विवाहाचा कायदेशीर पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय पती-पत्नीचे संयुक्त बँक खाते उघडणे, विमा पॉलिसी, पासपोर्ट काढणे, वारसा हक्क दावा, आंतरजातीय विवाह झाल्यास व शासकीय कामांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे; पण विवाह नोंदणीकडे नवदाम्पत्यांनी पाठ दाखविली आहे.
- ९ महिन्यांत ३७६० नोंदणी
नागपूर महापालिकेच्या दहाही झोनमध्ये विवाह नोंदणी केली जाते. चालू वर्षातील ९ महिन्यांत आतापर्यंत केवळ ३७६० विवाहांची नोंदणी महापालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील सभागृह, लॉन यांची संख्या किमान ५००च्यावर असून, या ९ महिन्यांत ३५ ते ४० हजारांवर विवाह झाल्याचे सभागृह चालकांनी सांगितले.
- चार वर्षांतील विवाह नोंदणी
२०१९ - ६००९
२०२० - २७२४
२०२१ - ३९२५
२०२२ - ४५२६
- नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी
२००० सालानंतर विवाह नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु विवाह नोंदणीबाबत अद्यापही जागरूकता नाही. विवाह नोंदणीकरिता माहिती घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. बहुतांश लोकांकडून कागदपत्रांची पूर्तता होत नाही. विवाह नोंदणीकरिता तीन साक्षीदार, वधू-वरांचे आधार कार्ड, राहण्याचा पुरावा, विवाह कार्ड, विवाहाचे फोटे यासह विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. बहुतांश नवविवाहित कागदपत्रांच्या अभावामुळे विवाह नोंदणी करीत नाही. गरज निर्माण झाल्यानंतर विवाह नोंदणी केली जाते.