नागपूर : अनुदानित शाळांमधील ९० शिक्षक अतिरिक्त ठरले होते. पुढे काय होईल, असा प्रश्न या सर्वांसमोर होता. प्रथमच त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली. जागीच समुपदेशन व समायोजन व थेट ऑर्डर या शिक्षकांना देण्यात आली. त्यामुळे या सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पटसंख्या कमी होण्यासोबतच विविध कारणांमुळे शंभर टक्के अनुदानित शाळांमधील ९० टक्के शिक्षक अतिरिक्त ठरले होते.जिल्हा परिषदेतील रिक्त जागांवर नियुक्ती देण्याची मागणी या शिक्षकांची होती. शिक्षणाधिकारी(प्राथमिन) रोहिणी कुंभार यांनी या सर्व शिक्षकांना एकाच वेळी नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. सेवाज्येष्ठता व बिंदुनामावलीनुसार या शिक्षकांची यादी तयार करण्यात आली. तीन समुपदेशनाने शिक्षकांना रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पदवीधर, दुसऱ्या टप्यात साहाय्यक शिक्षक व तिसऱ्या टप्यात सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे प्रलंबित असलेली शिक्षकांची मागणी पूर्ण झाली.
जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची ८५० पदे रिक्त आहेत. गेल्या आठवड्यात सेवानिवृत्त शिक्षकांतून ११७ पदे मानधनावर भरण्यात आली. आता पुन्हा ९० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे रिक्त जागा कमी झाल्याने विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. परंतु त्यानंतरही ६४० पदे रिक्त आहेत.