नागपूर : जगण्याची तीव्र इच्छा, डॉक्टरांचे परिश्रम आणि नातवाने दिलेल्या हिमतीच्या बळावर ९० वर्षीय आजीने कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन दिवसांपूर्वीच त्या आपल्या राहत्या घरी यवतमाळमध्ये परतल्या. कुटुंबीयांसोबत होळीही साजरी केली.
पार्वतीबाई खानझोडे (९०) रा. जिल्हा यवतमाळ, तालुका गांजेगाव, उमरखेड हे त्या आजीचे नाव. त्यांचा नातू अंकुश खानझोडे हे मेडिकलमधील महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, १३ मार्च रोजी आजीला सर्दी, खोकला आणि ताप आला. डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अहवाल पॉझिटिव्ह आला. घरचे सर्व लोक घाबरले. १५ मार्च रोजी आजीला नागपुरात आणले. १६ मार्च रोजी मेडिकलच्या मेडिसीन कॅज्युअल्टीमध्ये ठेवले. वॉर्डात बेड नसल्याने आजीने ती रात्र कॅज्युअल्टीमध्ये काढली. दुसऱ्या दिवशी तिने खूप गयावया करून मला येथून बाहेर काढा, अशी जिद्द केली. डॉक्टरांना सांगितल्यावर ते माझ्यावर चिडले. त्यांना हीच बाब आजीला समजावून सांगण्याची विनंती केली. डॉक्टरांनी आजीला भेटून रुग्णालयातच राहण्याचे समजावून पाहिले. पण, ती ऐकायला तयार नव्हती. घरी घेऊन चल, मी तिथेच बरी होईन, असा हट्ट धरला. तिच्या हट्टापायी शेवटी डॉक्टरांना माघार घ्यावी लागली. त्यांनी नियमित औषधी, शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीची तपासणी व आहाराकडे विशेष लक्ष देण्याची अट टाकली. आजीने आंगठा (थम्ब) दाखवीत सर्व अटी मान्य केल्या. तिला गावाला नेणे शक्य नव्हते. यामुळे माझ्या खोलीत ठेवले. तुला काहीच होत नाही, अशी हिंमत रोज द्यायचो. १० दिवसांच्या औषधोपचाराने ती बरी झाली. २६ मार्च रोजी तिची पुन्हा कोरोना चाचणी केली. अहवाल निगेटिव्ह आला. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. त्या डॉक्टरचे आभार मानले. होळी तोंडावर असल्याने गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तिला बसमध्ये किंवा रुग्णवाहिकेतून जायचे नव्हते तर माझ्या ‘रॉयल एनफिल्ड’ या दुचाकीवर बसून जायचे होते. या प्रवासात तिने आपल्या जीवनाचा आनंद घेतला. घरी गेल्यावर कुटुंबीयांनी औक्षण करीत टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले.