नागपूर : अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनी, गणतंत्र दिनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा दाखविण्यासाठी आपल्या घरावर ध्वजारोहण करता यावे, यासाठी कायदा करण्यात आला. दुसरीकडे देशाच्या ७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण झाले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व नागपूर जि.प.च्या ९० टक्के शाळेत ध्वजारोहण झालेच नाही.
जिल्हा परिषदेच्या शाळा या लहानपणापासून मुलांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांप्रति आदर, त्याग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सर्व इमारती ह्या सरकारी आहेत. सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात सरकारी इमारतीच्या ठिकाणी व परिसरात ध्वजारोहण झालेच पाहिजे, असा उल्लेख आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याच पत्राचा संदर्भ देत शिक्षकांनी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाला उपस्थित राहावे, असे पत्र शाळांना पाठविले. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि स्वातंत्र्य दिनाला शाळेवर तिरंगा फडकलाच नाही. विशेष म्हणजे या आशयाचे पत्र महाराष्ट्रातील कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रामुळे घोळ निर्माण झाला आणि त्यात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ध्वजारोहणासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली नाही. त्यामुळे ध्वजारोहण करू नये, असा संभ्रम पसरला.
- शिक्षकांचा आग्रह; मुख्याध्यापकांनी दाखविले पत्र
काही शाळेतील शिक्षकांनी शाळेत ध्वजारोहण करण्याचा आग्रह मुख्याध्यापकांकडे केला. परंतु मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र दाखवून ध्वजारोहणास नकार दिला. विशेष म्हणजे या पत्रात शाळेत ध्वजारोहण करू नये, असा कुठलाही उल्लेख नव्हता.