लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ओसरलेली लाट पुन्हा उग्र झाली आहे. तज्ज्ञांच्या मते पुन्हा नागपूर शहर व ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी मानकापूर क्रीडा संकुल येथे ९०० खाटांचे जम्बो रुग्णालय आणि २५ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेपासून वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांना मास्टर प्लान तयार करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावेत, कोरोना रुग्णांसाठी ५ हजार जंबो सिलिंडर उपलब्ध करावेत, १ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विकत घेतले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजनपुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करा आणि दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
प्रत्येक तालुक्यातील कोविड केअर सेंटर सक्षम केले जाईल. मेडिकल, मेयो एम्स व शहरातील अन्य खाजगी हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी याकडे लक्ष वेधा. इंदोरा भागातील आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल, हज हाउसचे श्रेणीवर्धन करण्यासाठी, तसेच
ग्रामीणमधील कोराडी, कामठी, रामटेक, मौदा, उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणीवर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. शहर व ग्रामीण भागात स्थानिक डॉक्टरांना होम क्वारंटाइनची शुश्रूषा करण्याचे निर्देश लवकरच राज्य शासन देणार आहे. त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाईल. रेमडेसिविर अन्य काही औषधांचा अतिरेकी वापर केल्यामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम दिसत आहे. त्यामुळे ट्रीटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकाऱ्यांची टीम गावांच्या भेटीवर जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तथापि, त्या गावातील आरोग्यसुविधा व पायाभूत सुविधांकडेदेखील लक्ष वेधण्याची सूचना त्यांनी केली.
रेमडेसिविर व औषधांचा काळाबाजार, आरटीपीसीआर अहवाल बोगस देणाऱ्या प्रयोगशाळामालकांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रिकामटेकड्यांना १४ दिवस सोडू नका
जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी
पोलिसांनी अँटिजन केलेल्या रिकामटेकड्यांना १४ दिवस सोडू नका, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांना केले, तसेच येत्या काळात शहरातील प्रमुख बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी पोलीस सक्त कारवाई करतील, असे स्पष्ट केले.
रमजानमध्ये घरीच राहा
यावेळी पालकमंत्र्यांनी मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी रमजानच्या काळात घरातच सण साजरा करावा, असे आवाहन केले. रमजानच्या काळात रात्री विनाकारण गर्दी वाढणार नाही व त्यातून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुस्लीमबांधवांनी साथ रोग लक्षात घेता याबाबत मी जबाबदार मोहीम राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ठळक वैशिष्ट्ये
२५ ऑक्सिजन प्लांट उभारणार
दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारणार
५ हजार जंबो सिलिंडर उपलब्ध होणार
दररोज १० हजार चाचण्या
१ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विकत घेणार
प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करणार
आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी, हज हाउसचे श्रेणीवर्धन
कोराडी, कामठी, रामटेक, मौदा, उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणीवर्धन
लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश
स्थानिक डॉक्टरांना होम क्वारंटाइन रुग्णाची शुश्रूषा करण्याचे निर्देश
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई
लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकाऱ्यांची टीम गावांच्या भेटीवर
जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे पोलिसांना आदेश
रेमडेसिविर व औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई
बोगस आरटीपीसीआर अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेवर कारवाई