नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) ९२ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी एमएच सेट परीक्षेत यश संपादित केले आहे.
महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट,सीएसआयआर नेट, एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. प्रशिक्षणासाठी एकूण १५५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या १२०७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. ११२७ विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर ८० विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यातील ९२ विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आवश्यक व अकस्मिक गरजेकरीता सहा महिने विद्यावेतन देण्यात आले. मोफत प्रशिक्षणात निवडण्यात आलेल्या विषयाचे वर्ग, विषयवार चर्चा, प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थ्यांमधे प्रियंका ठाकरे, परमेश्वर दास, वैभव कापसे, भुपेंद्र ढाले, महेश भांडे, भावीका शिंदे, अश्विनी वडे, उमेश पालवे, रिना चव्हाण, खुशवंत नांथे, विशाल आदमने, अपेक्षा गावंडे, विष्णू गोरे, मनिषा तोरकडे, विकास पिसे या व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- विद्यार्थ्यांचे मनोगत
वृत्तपत्राच्या माध्यमातून महाज्योतीच्या परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. अर्ज करुन प्रशिक्षणास पुणे येथे पाठवण्यात आले. सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत महाज्योतीकडून विद्यावेतन देण्यात आले. विद्यावेतनाने पुण्यात राहण्या, खाण्याची, शिक्षणाची, शैक्षणिक साहित्याची सोय करता आली. याआधारे सेट परीक्षा पास करता आली. आज मी कॉमर्स कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला लागलो. महाज्योतीमुळे आई-वडीलांचे स्वप्न साकार झाले.
- वैजनाथ भारत इडोळे, आडोळी, वाशीम
मी रसायनशास्त्र हा विषय घेऊन सेट पास झालेले आहे. सेट मधे दोन विषय असतात एक कॉमन असतो आणि दुसरा निवडायचा असतो. कॉलेजमधील शिक्षकांकडून महाज्योतीच्या परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. मार्गदर्शन मिळाले. महाज्योती गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्याला शैक्षणिक, आर्थिक मदत करत आहे. घडवित आहे.
- प्रणीता जावळे, जळगाव