राजीव सिंह
नागपूर : लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांसाठी जेव्हापासून होम आयसोलेशनची सोय सुरू झाली तेव्हापासून शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमीच राहिली आहे. परंतु आता दिवाळीनंतर बाधितांची संख्या वाढत आहे. रेल्वेस्थानकावर व विमानतळावर चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत आहे. ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वरही जोर दिला जात आहे. मात्र, त्यानंतरही कोविड केअर सेंटरमध्ये कोणी थांबण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. सध्याच्या स्थितीत या सेंटरमधील ९३ टक्के खाटा रिकाम्या आहेत.
कोविड केअर सेंटरमध्ये १,४६० खाटा आहे. सध्याच्या स्थितीत केवळ ९८ रुग्ण आहेत. गांधीबाग येथील एकमात्र हॉटेलमध्ये २३ खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. परंतु एकही रुग्ण नाही. नोव्हेंबर महिन्यात झोनच्या सहायक आयुक्ताना बाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना शोधून त्यांना ‘सीसीसी’मध्ये दाखल करण्याचे लक्ष्य दिले होते. परंतु नंतर ही योजनाच फसली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता मनपा प्रशासन कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या व्हीएनआयटी व पाचपावली सेंटर सुरू आहे. पाचपावली सेंटरमध्ये ९८ बाधित व संशयित रुग्ण दाखल आहेत.
-हॉटेलही होते सीसीसी
सप्टेंबरमध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहता काही हॉटेल्सना कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले होते. परंतु नंतर हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्यात आली. सध्या कुठेच कोविड रुग्ण दाखल नाहीत. पूर्वी हॉटेल ओरिएंट ग्रॅण्ड, हॉटल ओरिएंट क्लासिक, हॉटेल ओरिएंट एव्हेन्यू, हॉटेल शिवालिक इन, हॉटेल टाऊनहाऊस, हॉटेल राजधानी आदींना कोविड केअर सेंटर केले होते.
-क्वारंटाईन सेंटर सीसीसीमध्ये रूपांतरित
कोविडच्या सुरुवातीला कोरोना संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर निर्माण करण्यात आले. परंतु लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने व ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची सोय नाही अशांसाठी क्वारंटईन सेंटरलाच ‘सीसीसी’चे स्वरूप दिले होते.
-बंद करण्याची योजना नाही
मनपा अपर आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले, कोविड केअर सेंटर बंद करण्याची योजना नाही. या संदर्भातील कुठलेही आदेश नाहीत. येथे रुग्ण नसल्याने हे सेंटर अॅक्टिव्ह नाही. गरज पडल्यास सेंटर रुग्णसेवेत असणार.
कोविड केअर सेंटर
स्थळ बेड मरीज
पांचपावली सेंटर ६०० ९८
आमदार निवास ३५० ००
वनामती ११० ००
सिम्बायोसिस ४०० ००