अमरावती : दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथील गोड पाण्याच्या पायलट प्रोजेक्टमुळे खारपाणपट्ट्यातील गावांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊन लोकांना रोज गोड पाणी प्यायला मिळेल. गोड्या पाण्यामुळे येथील संत्री, फळबागांचे उत्पादन वाढेल. येथील पाण्याचा खारटपणा प्रत्येक लीटरला २५००मिलीग्रॅम असा आहे. आणि हे टीडीएस ५०० च्या आत आल्यावर हा प्रयोग यशस्वी ठरेल.
प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर वऱ्हाडातील तीन जिल्ह्यात असे ९४० प्रकल्प याच धर्तीवर निर्माण केल्यास हा प्रदेश खारपाणमुक्त प्रदेश होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी बोराळा येथे केले.
केद्रींय मंत्री गडकरी यांनी दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार रमेश बुंदिले, किरण पातुरकर,निवेदिता चौधरी, बोराळा सरपंच वनिता वसु तसेच विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, दर्यापूर कृषी अधिकारी भाग्यश्री अडपवार तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यावेळी उपस्थित होते.