लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान खात्याने यावर्षी अधिक पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त केली आहे. पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयात सध्या ९४.१० टक्के पाणीसाठा असला तरी भविष्यातील पाण्याची आवक लक्षात घेता या जलाशयाचे एक गेट शुक्रवार (दि. ११) पासून ०.३ मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे या गेटमधून १,११८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पेंच नदीच्या उगमाकडे मध्य प्रदेशात चाैराई, रामटेक तालुक्यात ताेतलाडाेह व पारशिवनी तालुक्यात पेंच ही तीन माेठी जलाशये आहेत. ताेतलाडाेह जलाशयातील पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी तर पेंच जलाशयातील पाण्याचा वापर पिण्यासाठी व सिंचनासाठी तसेच खापरखेडा व काेराडी वीज केंद्रात वीज निर्मितीसाठी केला जाताे.
पेंच जलाशयात सध्या ३२४.६२ मीटर पाणीपातळी असून, यात १३३.६१४ दलघमी (९४.१० टक्के) जिवंत पाणीसाठा आहे. पेंच नदीच्या उगमासह जलाशयाच्या परिसरातील पर्जन्यमान, पाण्याची आवक व जलाशयातील पाणीसाठ्याचे संतुलन लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पेंच नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील वर्षी पुराचा फटका
मागील वर्षी चाैराई धरणातून माेठ्या प्रमाणात पाणी साेडण्यात आल्याने ताेतलाडाेह व पेंच ही दाेन्ही जलाशये तुडुंब भरली हाेती. त्यामुळे २९ व ३० ऑगस्ट २०२० राेजी या दाेन्ही जलाशयांचे प्रत्येकी १६ गेट ५.५ मीटरने उघडण्यात आल्याने पेंच नदीला पूर आला. पेंच नदीकाठच्या सालई, नेऊरवाडा, पाली, उमरी, पालोरा, पिपळा, गवना, वाघोडा, डोरली, जुनी कामठी व सिंगारदीप या गावांना पुराचा फटका बसला हाेता. यात पिकांच्या नुकसानीसाेबतच पशु व वित्तहानी झाली हाेती. या नदीवरील सालई-माहुली येथील पूल काेसळला हाेता.