नागपूर : वर्धा मार्गावरील खापरी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)च्या एलपीजी बॉटलींग प्लांटमध्ये दोन दहशतवादी शिरल्याची बातमी पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी सकाळी १०.५५ ला मिळाली अन पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. ३४ कमांडोचा ताफा आणि पोलीस अधिकारी अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. कथित दहशतवाद्यांनी एचपीसीएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंधक बनवून ठेवले होते. कमांडोजनी एचपीसीएल परिसराचा ताबा घेतला. तब्बल ९५ मिनिटे विशेष ऑपरेशन राबवून क्यूआरटी कमांडोजनि एकादहशतवाद्याचा खात्मा केला. तर दुसऱ्याला जिवंत पकडले. आतमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुक्तता करण्यात आली. ऑपरेशन सक्सेसचा मेसेज नियंत्रण कक्षाला देण्यात आला आणि पावणेदोन तासापासून खापरी परिसरात सुरु असलेली कारवाई थांबली.
एचपीसीएल डेपोमध्ये दहशतवादी शिरल्याच्या वृत्ताने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती. त्यामुळे आजूबाजूची मंडळीनी या भागात गर्दी केली होती. पत्रकारांनीही नियंत्रण कक्षाला फोन करून शहानिशा करून घेतली. ही मॉकड्रील असल्याचे कळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या पोलीस निरीक्षक मांडवधरे, शीघ्र कृती दलाचे उपनिरीक्षक केदारे आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सकाळी ११.१५ ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत हे ऑपरेशन राबविले.
सतर्कता तपासण्यासाठीअचानक अशी काही घटना घडल्यास पोलीस किती सतर्क आहेत, हे तपासण्यासाठी वेळोवेळी अशा मॉकड्रिल वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जातात. त्यासाठी एचपीसीएल प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आधीच बोलणी झाली होती.
मोठी गर्दी, वाहतूक वळविलीएचपीसीएलमध्ये ऑपरेशन सुरू असताना खापरी भागातील वाहतूक काही वेळेसाठी दुसरीकडून वळविण्यात आली होती. तर,एसपीसीएलमध्ये दहशतवादी शिरल्याच्या वृत्ताने या भागातील नागरिकांत घबराट निर्माण झाली होती.