लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांचे गळे कापून निरपराधांच्या जिवावर उठू पाहणाऱ्या मस्कासाथ ईतवारीतील हर्षल नरेशराव वैरागडे (वय २५) आणि प्रवीण यशवंतराव डांगरे (५०) या दोघांच्या लकडगंज पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून घातक मांजाच्या ९६ चक्र्या जप्त केल्या.
आरोपी वैरागडे आणि डांगरे अनेक दिवसांपासून मांजा विक्रीच्या गोरखधंद्यात आहेत. मांजामुळे दरवर्षी अनेक निरपराधांचे गळे कापले जातात. अनेकांचे बळी जातात. मात्र, पैशासाठी हपापलेल्यांना त्याची कसलीही खंत वाटत नाही. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असे गळेकापू जीवघेणे प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी मांजा विकणे, साठवणे आणि वापरण्यावर बंदी घालणारा आदेश काढला आहे. मांजा विकणाऱ्या, साठवणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लकडगंजचे हवालदार अरुण धर्मे यांना ईतवारीतील आरोपी वैरागडे आणि डांगरे मांजा विक्रीचा धंदा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी मांजाची साठवणूक त्यांच्या मस्कासाथमधील गोदामात करून ठेवल्याचेही त्यांना कळले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लकडगंज पोलिसांनी प्रवीण डांगरेच्या गोदामात छापा टाकला. तेथे पोलिसांना मांजाच्या एकूण ९६ चक्री आढळल्या. त्या जप्त करून ठाणेदार पराग पोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी वैरागडे तसेच डांगरे या दोघांवर मनाई आदेशाचे उल्लंघन तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाप्रमाणे कारवाई केली.