नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून सर्वसाधारणत: फोनवर एखादी लिंक पाठवून किंवा जॉबच्या नावाखाली टास्क देऊन बॅंकेतील पैसे दुसरीकडे वळते करण्यात येतात. मात्र, आता गुन्हेगारांनी नवीन फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना चक्क बॅंकेतून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस पाठविण्यात येतो. यामुळे ग्राहक घाबरले की लगेच त्यांना संपर्क करून जाळ्यात ओढण्यात येते व त्यानंतर तपशील घेत गंडा घालण्यात येतो. नागपुरात या ‘मोडस ऑपरेंडी’चा उपयोग सुरू झाला असून अज्ञात गुन्हेगारांनी एका व्यक्तीला काही मिनिटांत तब्बल ९.६६ लाखांचा गंडा घातला.
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सतीश दीक्षित (५७, न्यू सुभेदार ले आऊट) यांना १९ जुलै रोजी एका अज्ञात इसमाचा फोन आला व तुमचे सरकारी पेपर आले असून तुम्हाला मी एक एसएमएस पाठवतो, तो मला परत पाठवा, असे त्याने सांगितले. दीक्षित यांनी तो एसएमएस उघडला व फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फॉरवर्ड होऊ शकला नाही. त्यांना काही वेळातच मोबाइलवर फोन आला व त्यांच्या बंधन बॅंकेच्या खात्यातून बोलत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. तुमच्या खात्यात फ्रॉड झाला असून तुमचे खाते फ्रीज करत असल्याचे त्याने सांगितले.
दीक्षित यांनी मोबाइल तपासला असता त्यांना खात्यातून ६६ हजार रुपये डेबिट झाल्याचा एसएमएस आला होता. हे पाहून दीक्षित यांची खात्री पटली व ते घाबरले. त्यानंतर त्यांनी समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून बॅंक खाते फ्रीज करण्यासाठी अगोदर डेबिट कार्डचे तपशील दिले. तसेच त्याला फोनवर आलेले सर्व ओटीपी ते शेअर करत गेले. त्यांच्या मोबाइलवर परत एसएमएस आले व टप्प्याटप्प्याने ९.६६ लाख रुपये दुसरीकडे वळते झाल्याचे त्यात नमूद होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीक्षित यांनी बॅंकेला प्रत्यक्ष फोन करून हा प्रकार कळविला व बॅंक खाते फ्रीज करण्यास सांगितले. दीक्षित यांनी अगोदर सायबर सेल व त्यानंतर हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
अगदी खरा वाटला बनावट एसएमएस
सायबर गुन्हेगारांनी दीक्षित यांना घाबरवण्यासाठी बॅंकेतून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस पाठविला होता. पैसे डेबिट झाल्याची माहिती लाल मार्किंगमध्ये होती. त्यामुळे दीक्षित यांना तो खरा एसएमएस असल्याचे वाटले. त्यांच्या घाबरलेल्या स्थितीचाच सायबर गुन्हेगारांनी फायदा उचलला. जर अशाप्रकारे पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस आला तर तत्काळ बॅंकेच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.