लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरामध्ये १ जानेवारी ते ७ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये ९८ डेंग्यू बाधितांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या मलेरिया व फायलेरिया विभागातर्फे यासंबंधीची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
शहरामध्ये ६२६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ९८ रुग्ण डेंग्यूचे आढळले. यामध्ये जून महिन्यात सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रभाग २१ मधील प्रेमनगर निवासी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मनपातर्फे १ लाख ३३ हजार २१७ जणांची मलेरियाची चाचणी करण्यात आली. मलेरियाच्या रुग्णांच्या जाहीर आकडेवारीनुसार शहरात ५ मलेरियाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. ५ रुग्णांचा अहवाल मलेरिया पॉझिटिव्ह आल्याची माहिती मनपाच्या मलेरिया व फायलेरिया अधिकारी दीपाली नासरे यांनी दिली.
डेंग्यूचे सर्वाधिक १८ रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळले. या पाठोपाठ ऑगस्ट, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रत्येकी १६ रूग्णांची नोंद झाली. जुलैमध्ये १०, जानेवारीे ८, जून ७, फेब्रुवारी ४, मे महिन्यात २ रुग्णांची नोंद झाली. एप्रिल आणि डिसेंबरमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
मलेरियाचे जून व जुलैमध्ये ४ आणि ऑक्टोबरमध्ये १ असे एकूण ५ रुग्ण आढळले आहेत.
...
काळजी घ्या, सुरक्षित राहा
नागपूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील रुग्णांची संख्या खूप झाली आहे, ही बाब सुखद असली तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. घरी, परिसरात जिथेही डासांची पैदास होण्याची शक्यता असेल अशी ठिकाणे तात्काळ बंद करा. घाण होणार नाही, कचरा जमा राहणार नाही. डेंग्यू, मलेरिया हे आजार डासांपासून पसरतात त्यामुळे डासांपासून शरीराचे संरक्षण करणारे कपडे वापरा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.