लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात भयावह रूप धारण केले आहे. विशेषतः एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा नागपूरसाठी घातक ठरला आहे. केवळ १४ दिवसांत जिल्ह्यात ९८ हजारांहून अधिक नवीन बाधित आढळले, तर या कालावधीत बाराशेहून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले. कोरोनाच्या संसर्गाचा हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान व दुर्दैवी पंधरवडा राहिला.
नागपूर जिल्ह्यात ११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. मार्च २०२० मध्ये एकूण १६ रुग्ण सापडले होते. जुलै महिन्यापासून संसर्गाची तीव्रता वाढली व सप्टेंबरमध्ये पहिल्या लाटेतील अत्युच्च बाधितसंख्या नोंदविल्या गेली. सुमारे १८६ दिवसांनी रुग्णसंख्या ५० हजारांवर पोहोचली, तर २३५ दिवसांनी लाखाचा टप्पा गाठला. गुरुवारी नागपूरने चार लाखांचा टप्पा पार केला. नागपुरात आतापर्यंत चार लाख एक हजार ३२६ कोरोनाबाधित आढळले आहेत.
७२ टक्के बाधित शहरातील
आतापर्यंत आढळलेल्या बाधितांपैकी दोन लाख ९० हजार ६५३ रुग्ण नागपूर शहरात आढळले तर ग्रामीण भागात एक लाख नऊ हजार ४४६ रुग्ण सापडले. शहरात ७२ टक्के बाधित शहरातील होते. एकूण बाधितांपैकी तीन लाख १६ हजार ३९९ म्हणजेच ७८.८४ टक्के बाधित ठणठणीत झाले.
एप्रिल ठरला धोकादायक
एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसात ७६ हजार ८११ पॉझिटिव्ह आढळले तर ९३६ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतरच्या १४ दिवसांत ९८ हजार ४७७ बाधित सापडले. एप्रिल महिन्याच्या २९ दिवसांतच एक लाख ७५ हजार २८८ रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत दोन हजार २०२ जणांचा मृत्यू झाला.
महिनानिहाय बाधित
महिना - बाधित
मार्च २०२० – १६
एप्रिल २०२० – १२३
मे २०२० – ३९२
जून २०२० – ९७२
जुलै २०२० – ३,८८९
ऑगस्ट २०२० – २४,१६३
सप्टेंबर २०२० – ४८,४५७
ऑक्टोबर २०२० – २४,७७४
नोव्हेंबर २०२० – ८,९७९
डिसेंबर २०२० – १२,००२
जानेवारी २०२१ – १०,५०७
फेब्रुवारी २०२१ – १५,५१४
मार्च २०२१ – ७६,२५०
एप्रिल २०२१ (२९ एप्रिलपर्यंत) – १,७५,२८८
लाखनिहाय टप्पा
एक लाख रुग्ण – २३५ दिवस (३१ ऑक्टोबर २०२०)
दोन लाख रुग्ण – १४४ दिवस (२४ मार्च २०२१)
तीन लाख रुग्ण – २२ दिवस (१५ एप्रिल २०२१)
चार लाख रुग्ण – १४ दिवस (२९ एप्रिल २०२१)