लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटक स्वांत सुखाय या उक्तीप्रमाणे मुंबई-पुण्यातच फक्त व्यावसायिक किंवा धंदेवाईक नाटक नसून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातसुध्दा कलाकार मोठ्या संख्येने पुढे येत असून अस्सल मातीतलं नाटक हे गावाकडून शहराकडे येत असल्याचं मत मुंबई पुण्याच्या बाहेरील रंगकर्मींनी नाट्य संमेलनात रविवारी झालेल्या परिसंवादात मांडले. मराठी रंगभूमी उणे मुंबई पुणे या परिसंवादात जमलेल्या मान्यवरांनी मुंबई- पुण्याबाहेरील रंगकर्मींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांनी सरकारशी बोलून ठोस पावलं उचलायला हवीत याबद्दल पुनरुच्चार केला.या परिसंवादात वामन पंडित, रजनीश जोशी, दत्ता पाटील, सलीम शेख, डॉ सतीश पावने, विवेक खेर, मुकुंद पटवर्धन ही मुंबई-पुण्याबाहेरील रंगकर्मी मंडळी सहभागी झाली होती. या गावाकडच्या सच्च्या रंगकर्मींना यावेळी बोलतं केलं पत्रकार राज काझी यांनी. मुकुंद पटवर्धन यांनी राज्यात होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा, बालनाट्यस्पर्धा यांवर भाष्य केलं. जोपर्यंत एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाऊन या स्पर्धांना वेगळं रूप दिलं जाणार नाही तसेच दोन ते तीन सेंटरना एकत्र करून केल्या जाणाऱ्या स्पर्धांना जोपर्यंत वेगवेगळं केले जाणार नाही तोपर्यंत मुंबई-पुण्याबाहेरील कलाकाराला योग्य तो न्याय मिळणार नाही. ९० नाटकांमध्ये फक्त ३ नाटकं निवडणे हा कोणता न्याय, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. बाकी मान्यवरांनी अडचणींबरोबरच घडत असलेल्या बदलाबाबतही विस्तृत भाष्य केले. मुळात रंगभूमी म्हटलं की मुंबई- पुणे आता जरा नाशिकपर्यंत तरी म्हटली जाते. मात्र सध्याचं चित्र उलटं आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अस्सल कलाकारही मुख्य धारेत आपली चमक दाखवतायत. फक्त त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात लागणारी मोलाची मदत आणि योग्य साथ फार गरजेची आहे. शासन दरबारी राज्य नाट्य स्पर्धा आणि बालरंंगभूमीविषयी भयंकर उदासीनता आहे. त्याच त्याच पध्दतीने आणि नियमांनी आजही या स्पर्धा राबविल्या जात आहेत. त्यामुळे खरंच कलाकार हा मुंबई-पुण्याबाहेर पोहचेल का, असा प्रश्न पडतो. मुळात सध्या सोशल मीडियाच्या प्रसारामुळे जग जवळ आलेलं असल्याने मुंबई-पुण्याच्या बाहेरील रंगकर्मीही या उदासीन प्रवृत्तीला न बळी पडता बाहेर पडतायत आणि आपलं करिअर करतायत. मात्र ही अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजता येणारी आहेत अशी खंत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
अनेक ठिकाणी नाट्यगृहच नाहीतप्रायोगिक, हौशी आणि बालरंगभूमीवर मुंबई पुण्याबाहेर काम करणारे रंगकर्मी हे रंगभूमीच्या प्रेमापोटी मिळेल त्या साधनात, अपुºया पैशात आपली नाटकाची आवड जपत असतात. मात्र वर्षानुवर्षे हे करणं एक तर शक्य नसतं किंवा ते त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे सरकारने अशा रंगकर्मींच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. मुंबई-पुण्याबाहेर नाट्यगृहांची अवस्थाही वाईट आहे. अनेक ठिकाणी नाट्यगृहच उपलब्ध नाहीत. मात्र तरीही जिद्दीने एका तडफेने हे रंगकर्मी नवनवीन कल्पना घेऊन दरवर्षी आपल्या नाटकांचे प्रयोग करत ़असतात. मात्र सरकारने गावातील या रंगकर्मींसाठी राज्य नाट्य स्पर्धा आणि इतर शासकीय स्पर्धांची बक्षिसाची रक्कमही दुपटीने वाढवण्याची गरज आहे. जेणेकरून या रंगकर्मींना पुढे जाऊन चांगलं नाटक करण्याची उर्मी मिळेल, असे मतही मान्यवरांनी यावेळी मांडलं. सुरेश भट सभागृहात झालेल्या या परिसंवादाला वामन केंद्रे, शफाअत खान अशा ज्येष्ठ नाट्यकर्मींचीही विशेष उपस्थिती होती.