लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या ९९ व्या अंकाचा समारोप झाला. प्रचलित शब्दानुसार संमेलनाचे सूप वाजले. साडेतीन दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागपुरात आणि पर्यायाने विदर्भात झालेले हे संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्णच ठरले. प्रजा आणि राजाचा संवाद येथे रंगला, नाट्यकलेच्या बहुतेक रंगांची उधळणही झाली आणि वेळेची गणित बिघडली तरी अनेक हात एकत्रित येऊन संमेलन सलग ६३ तास चालण्याचा विक्रमही येथे झाला. काय मिळाले आणि काय सुटले याचे ठोकताळे बांधता येणे शक्य नसले तरी कायम स्मरणात राहावी अशी आठवण या संमेलनाच्या निमित्ताने वैदर्भीय नाट्यकर्मी व नाट्यप्रेमींना दिली. मात्र या संमेलनाने अपेक्षाही निर्माण केल्या. या अपेक्षा कोणत्याही मोठ्या आयोजनापेक्षा ‘नाटक : उणे मुंबई-पुणे’ या अधिक आहेत.बोधी वैचारिकतेचा वारसा लाभलेला नाटककार प्रेमानंद गज्वी संमेलन अध्यक्ष म्हणून लाभणे हेही या संमेलनाचे वैशिष्ट्यच होते. अर्थातच अनेक वर्षानंतर होत असलेल्या नाट्यसंमेलनाची उत्सुकता होतीच. ही उत्सुकता पहिल्याच दिवशी निघालेल्या नाट्यदिंडीने अधिकच वाढविली. महालच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असलेले देखावे, लोककलांचे आक र्षक सादरीकरण आणि मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी अभिभूत करणारी ठरली. जोश आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उद््घाटनाच्या वेळी प्रजेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार आणि प्रेमानंद गज्वी यांनी धर्म, अभिव्यक्ती, शहरी नक्षलवाद अशा वर्तमान मुद्यांवरून सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यास दिलेले उत्तर आणि समारोपाला पुन्हा गज्वी यांची फटकेबाजी, हा संवाद तमाम महाराष्टÑाने अनुभवला. संमेलनभर ही चर्चा रंगत राहिली.संमेलनाच्या पहिल्या दिवशीपासून वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे सादरीकरण नाट्यकर्मी व नाट्यप्रेमींनी अनुभवले. विविध नाट्य स्पर्धांमध्ये गाजलेल्या व समाजातील ज्वलंत विषयांना हात घालणाºया एकांकिका, नाट्यकलेचा समृद्ध वारसा चालविणाºया झाडीपट्टीची दोन नाटके, सोलापूर येथील संस्थेतर्फे कन्नड शैलीतील ‘विश्वदाभिराम’ हे मराठी नाटक, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांची वेदना मांडून शेतकऱ्यांना जगण्याची उर्मी देणारे ‘तेरवं’ या नाटकाने लक्ष वेधले. एकाचवेळी हसू व अश्रु मांडणारे एकपात्री प्रयोग, परिसंवाद आणि मराठी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडविणाºया संगीतमय कार्यक्रमांनी रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आनंदवनच्या बालकलावंतांचे मनोहर सादरीकरण, ९९ संमेलने व संमेलनाध्यक्षांचा इतिहास दर्शविणारी ‘संमेलनाची वारी’ रसिकांना अनुभवायला मिळाली. सुरेश भट सभागृह व रेशीमबागची राम गणेश गडकरी नाट्यनगरी परिसर दिवसरात्र रंगकर्मी व रसिकांच्या उपस्थितीने फुलला होता. तरुण कलावंतांना दिशा देणारा आणि ज्येष्ठांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा होता.संमेलनाच्या निमित्ताने का होईना रंगकर्मी एकत्रित आले आणि जमेल त्या पद्धतीने सहभाग घेतला. काही नाराजही झाले. दखल न घेतल्यामुळे महानगर शाखेचे सलीम शेख सुरुवातीला नाराज झाले, पण हे आपले संमेलन आहे असा समजूतदारपणा दाखवला एकांकिकेच्या माध्यमातून बहुजन रंगभूमीनेही सहभाग नोंदविला. नाट्य परिषदेसह अनेक नाट्य संस्था पुढे आल्या.काही नकोशा गोष्टींचा उल्लेखही येथे महत्त्चाचा ठरेल. नाट्यदिंडीपर्यंत सर्व व्यवस्थित असताना उद््घाटनापासून बिघडलेले वेळेचे गणित शेवटपर्यंत आयोजकांना सांभाळणे शक्य झाले नाही. एवढे की आनंदवनच्या मूकबधिर मुलांनाही त्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत वाट पाहण्याचा मनस्ताप सहन करावा लागला. अ.भा. नाट्य परिषद व नागपूर शाखेतील मतभेदही यातून समोर आला. स्वतंत्र बालनाट्य संमेलन होते, पण पथनाट्य आणि लोककलावंतांच्या सहभागापासूनही संमेलन वंचित राहिले. अनेक हात राबत असल्याने या उणिवा टाळता आल्या असत्या.ज्येष्ठ नाट्यकर्मींच्या संवादातून पुढे आलेला महत्त्वाचा मुद्दा येथे मांडणे अगत्याचे ठरेल, तो म्हणजे नागपूर व विदर्भाची रंगभूमी मजबूत करण्याचा. पुण्या-मुंबईच्या नाटकांना येथे गर्दी होते, मात्र येथील नाटकांना तिकडून मागणी कधी येणार, हा प्रश्न आहे. नाना जोग, दारव्हेकर मास्तरांच्या नाटकांना एकेकाळी पुण्या-मुंबईतही हाऊसफुल्ल गर्दी व्हायची, तसे आता होत नाही. कला, अभिनय व तांत्रिक बाबतीत तशी दर्जेदार नाट्यकृती कशी घडेल आणि आधुनिकतेच्या आव्हानांना कसे पेलविता येईल, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.त्या अंगाने कुठलेही मार्गदर्शन न लाभल्याने संमेलनातून काहीच साध्य न झाल्याची ज्येष्ठ नाट्यकर्मींची खंत विचार करायला करणारी आहे. याबाबत सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.
९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन; नाट्यसंमेलनाने वाढविल्या अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:18 AM
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या ९९ व्या अंकाचा समारोप झाला. प्रचलित शब्दानुसार संमेलनाचे सूप वाजले. साडेतीन दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागपुरात आणि पर्यायाने विदर्भात झालेले हे संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्णच ठरले.
ठळक मुद्देउत्सव सुरेख, रंगभूमी मजबूत करण्याचे आव्हानवेळेच्या नियोजनाचाही धडा