लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्य संमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही. अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मान, सन्मानावरून नाट्य संमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पेटली आहे.नागपुरात अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या दोन शाखा आहे. एका नाट्य परिषदेची नागपूर शाखा आणि दुसरी महानगर शाखा. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी दोन्ही शाखेला दिली. संमेलनाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी नागपूर शाखेला दिली आणि संमेलनाच्या विविध आयोजनात महानगर शाखेला समावून घेण्यात येणार होते. पण संमेलनाच्या आयोजनासंदर्भात गेल्या काही दिवसात झालेल्या बैठकांमध्ये महानगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. संमेलनाच्या आयोजनासाठी ज्या काही वीस-बावीस समित्या तयार करण्यात आल्या. त्या समितीच्या अध्यक्षपदाची, निर्णय घेण्याची जबाबदारी महानगर शाखेला दिली नाही. त्यामुळे महानगर शाखेने नाराजी व्यक्त करीत संमेलन आयोजकाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. संमेलनावर बहिष्कार न घालता, आयोजनात सहभागी होणार नाही, अशी भूमिका महानगर शाखेने घेतली आहे.- आयोजकांच्या कारभाराला विरोधआतापर्यंतच्या इतिहासात जिथे संमेलन झाले. तिथे जर दोन शाखा असतील तर दोघांनी मिळून संमेलन पार पाडले. पण ९९ व्या नाट्य संमेलनाच्या आयोजनात आमच्या शाखेला डावलले जात आहे. यासंदर्भात मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कामडी यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा कामडी यांनी गिरीश गांधी यांच्यासमोर सन्मानजनक वागणुक देऊ, हवी ते समिती देऊ असा शब्द दिला होता. पुढे संयोजन समितीत माझे नाव टाकले. पण एकाही बैठकीला बोलावले नाही. जेव्हा समित्या ठरविण्याची बैठक झाली. तेव्हा नागपूर शाखेने १५ समित्या पुर्वीच ठरवून टाकल्या होत्या. समित्या ठरविण्यात आम्हाला सन्मानजनक वागणुक दिली गेली नाही. समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले नाही. त्यामुळे संमेलनाची जबाबदारी पार पाडणाºया मध्यवर्ती व नागपूर शाखा ज्या पद्धतीने कारभार करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे. संमेलनादरम्यान घटनात्मक मार्गाने त्याचा आम्ही विरोध करू.- सलीम शेख, अध्यक्ष , महानगर शाखा- महानगर शाखेच्या ज्या काही तक्रारी होत्या, त्यांनी माझ्याकडे मांडायला हव्या होत्या. पण त्यांच्याकडून कुठल्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाही. ऐन संमेलनाच्या तोंडावर तक्रारी पुढे करून, संमेलन वादातीत आणणे योग्य नाही. बऱ्याच वर्षानंतर नागपुरात संमेलन होत आहे, ते चांगले पार पडावे हा माझा हेतू आहे.प्रसाद कामडी, अध्यक्ष, मध्यवर्ती शाखा.