निशांत वानखेडे/मंगेश व्यवहारे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्याच्या लोकांना दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत कुणी त्रास दिलेले चालत नाही, असा विनोद सर्वपरिचित आहे. हा विनोद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या नागपुरात सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होय. तर मुंबईप्रमाणेच नागपूरचे संमेलन सलग ६० तास करण्याचा अट्टाहास अ.भा. मराठी नाट्य परिषद व स्थानिक आयोजकांनी केला आणि तो पहिल्याच दिवशी आपटला. एकतर रात्रीच्या नाटकाला प्रेक्षकांची संख्या नसल्यागत होती आणि नाटक उशिरा सुरू झाल्याने असलेल्या प्रेक्षकांनीही खुर्चीतच माना टाकल्या.सध्या कार्यरत असलेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीने मागील वर्षी मुंबईत झालेल्या ९८ व्या संमेलनातील कार्यक्रम सलग ६० तास चालविण्याचा पराक्रम केला होता. यासाठी कार्यकारिणीच्या लोकांनी परिश्रम घेतले यात त्यांचे श्रेयच आहे. मात्र मुंबईत झाले म्हणून ते नागपुरातही आपण करू हा अट्टाहास करणे म्हणजे अतिविश्वास बाळगणे होईल, असेही त्यांना वाटले नाही. बरे परिषदेने हा प्रस्ताव मांडला म्हणून स्थानिक आयोजकांनी प्रेक्षकांचा विचार न करता त्यास होकार देणे कितपत योग्य आहे, असा सवाल अनेकांनी केला.सलग कार्यक्रमाच्या नियोजनानुसार संमेलनाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री १ वाजता ‘आक्रोश’ या झाडीपट्टीच्या नाटकाचा प्रयोग ठरला होता. मात्र सुरुवातीलाच वेळ झाल्यामुळे पुढील प्रत्येक कार्यक्रम उशिरा होतील, हे निश्चितच होते आणि झालेही तसेच. कविवर्य सुरेश भट सभागृहात रात्री १० वाजता अभिनेता भरत जाधव यांचे ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक ११ नंतरच सुरू झाले आणि त्याचा फटका शेवटच्या नाटकालाही बसला. लोकप्रिय नाटक आणि त्यात भरत जाधव असल्याने प्रेक्षकांनी हे नाटक होईपर्यंत तग धरला आणि १ ते सव्वा वाजताच्यादरम्यान हे नाटक संपताच बहुतेक प्रेक्षकांनी घरचा रस्ता धरला. निम्म्यापेक्षा जास्त सभागृह रिकामे झाले होते. पाचपन्नास राहिले ते झाडीपट्टीचे चाहते आणि काही रंगकर्मी. त्यातही १ वाजता सुरू होणारे नाटक रात्री ३ वाजतापर्यंत सुरुच झाले नव्हते. त्यामुळे सभागृहातील प्रेक्षकही निद्राधीन झाले होते. नाटक सुरू झाल्यानंतर किती पे्रक्षकांनी त्याचा आस्वाद घेतला हा विचाराचाच प्रश्न आहे.आयोजनातील एका स्थानिक पदाधिकाऱ्याने व्यासपीठावरून ‘नागपूरच्या प्रेक्षकांना नाटकांची जाण नाही’असे म्हटले होते.दिग्गज साहित्यिक, नाटककार प्र.के. अत्रे एकेकाळी बोलले होते, ‘नागपूरचा प्रेक्षक चोखंदळ आहे व त्यांना सकस काहीतरी हवं असतं. नाटक आवडलं नाही तर ते रंगमंचाकडे पाठ करून बसायलाही मागेपुढे पाहत नाही.’ त्यामुळे नागपूरच्या प्रेक्षकांची जाणीव ठेवून कार्यक्रमांचे नियोजन आखणे अधिक सोईचे ठरले असते आणि रात्रीचे कार्यक्रम ठेवायचेच होते तर प्रेक्षक रात्रीही संमेलन स्थळाकडे वळतील, त्या दर्जाचे कार्यक्रम ठेवणे आवश्यक होते, असेही मत अनेकांनी मांडले. झाडीपट्टीची नाटके रात्री का?संमेलनात झाडीपट्टीच्या नाटकांना संधी देण्यात आली. मात्र दोन्ही दिवशी ही नाटके मध्यरात्री १ वाजता ठेवण्यात आली. पहिल्या दिवशी झाडीपट्टीचे ‘आक्रोश’ हे नाटक १ ऐवजी रात्री ३ नंतर सुरू झाले व त्यावेळी प्रेक्षक संख्या कमी होती. दुसºया दिवशीही ‘अस्सा नवरा नको ग बाई’ हे नाटक रात्री १ वाजताचे आहे. त्यामुळे नाटक रात्री का ठेवले, असा सवाल विचारला जात आहे. आम्हाला रात्रीचे नाटक करण्याची सवय आहे, मात्र नागपूरच्या प्रेक्षकांचे काय? ‘पुन्हा सही रे...’ या व्यावसायिक नाटकाच्यापूर्वी झाडीपट्टीच्या नाटकाला संधी द्यायला हवी होती, अशा भावनाही काहींनी मांडल्या. संधी देऊनही उपेक्षा झाल्याचे म्हटले जात आहे.