नागपूर : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर आरोपीने एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिला लग्नाचे आमीष दिले. आपल्या घरी नेऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. परंतु मुलगी गर्भवती झाल्यामुळे आरोपीचे बिंग फुटले. मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिवम शेषराम मेहरा (१९, रा. एकतानगर भांडेवाडी पारडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची १ ऑक्टोबर २०२३ ते १७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. अल्पवयीन मुलगी दहावीला शिकत आहे. तिच्या कुटुंबात आईवडिल व तीन भाऊ आहेत. तिचे आईवडिल मजुरी करतात. अल्पवयीन मुलगी आणि आरोपीत दररोज चॅटींग होऊ लागली. दरम्यान आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला लग्नाचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर आरोपीने तिला आपल्या राहत्या घरी नेऊन तिच्यासोबत वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. मुलगी गर्भवती झाल्याची बाब तिच्या आईवडिलांना कळताच त्यांनी पारडी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पारडी ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा सागर यांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (आय) (एन), सहकलम ४, ५ (जे), ६ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.