नागपूर : वातावरणातील बदल, अवकाळी पावसामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. डासांचाही प्रकोप शहरासोबतच ग्रामीणमध्येही मोठयाप्रमाणात वाढला आहे. मौदा तालुक्यातील राजोली येथील एका १७ वर्षीय तरुणाचा योंग्य उपचाराअभावी डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
साहील मेघश्याम श्रावणकर असे डेंग्यू आजाराने दगाविलेल्या तरुणाचे नाव आहे. राऊत यांनी सांगितले की, १२ मे रोजी त्या तरुणाला ताप आल्यानंतर त्याने कोदामेंढी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु त्यानंतरही त्याचा ताप कमी होत नसल्याने त्याची खासगीमध्येच रक्त तपासणी होऊन सलाईन लावण्यात आली. परंतु त्याची प्रकृती त्यातुनही बरी न झाल्याने त्याला १५ मे रोजी भंडाऱ्यातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे त्याचे प्लेटलेट व रक्तदाब कमी झाल्याने १६ मे रोजी त्याला रुग्णालयातुन सुटी देत नागपूरच्या रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत सांगण्यात आले. याचदरम्यान नागपूरला जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जि.प. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याची डेंग्यूची चाचणी केली असता, त्यात तो सकारात्मक आढळून आला. या तरुणाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात घराघरामध्ये धुरफवारणी करण्यात आली. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या गावातील १७ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले असता, त्यापैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्व रुग्णांची प्रकृती आता ठणठणीत आहे. संपूर्ण गावामध्ये कोदामेंढी पीएचसी व ग्रा.पं.च्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. आपण स्वत: गावभेटीतुन आजारावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या असल्याचे राऊत यांनी सांगितले....जिल्ह्याभरात आशा देणार ‘डोअर टू डोअर’ भेटीसातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. याशिवाय जिल्ह्यात डेंग्यूचेही रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांचे वेळीच उपचार होऊन निदान व्हावे, यासाठी आशा सेविकांच्या माध्यमातून येत्या सोमवारपासून जिल्ह्याभरात ‘डोअर टू डोअर’ भेटी देण्यात येणार आहे. या माध्यमातून लक्षणे असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), उपकेंद्रामध्ये आणून त्यांची रक्तपासणी करून, त्यानंतर येणा-या अहवालाच्या आधारावर त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार असल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.