नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. नागपूरचे शहर अध्यक्ष असलेले दुनेश्वर पेठे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याला पसंती दिली. पेठे सोबत येतील याची वाट पाहून शेवटी अजित पवार गटाने प्रशांत पवार यांना नागपूर शहर अध्यक्ष नेमले. पेठे व पवार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी आता या दोन मित्रांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
देनेश्वर पेठे हे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या बैठका प्रशांत पवार यांनी काचिपुरा येथे सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयातच जास्त असायच्या. येथूनच विविध आंदोलनांचे नियोजन व्हायचे. सोबतच मुंबई दौरा ठरायचा. पवार-पेठे हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे चित्र होते. या दोन्ही नेत्यांनी मिळून भाजपविरोधात ताकदीने आंदोलने केली. तर अनेकांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडली.
प्रशांत पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जास्त जवळीक असल्याने ते अजित पवार यांच्यासोबत गेले. तर शरद पवार यांच्यावरील निष्ठेपोटी दुनेश्वर पेठे यांनी साहेबांचाच झेंडा घेणे पसंत केले. आता प्रशांत पवार हे अजित पवार गट मजबूत करण्यासाठी धडपड करतील. राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न होतील. ती लाट थोपविण्याचे आव्हान पेठे यांना पेलायचे आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले पेठे हे राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक होते. त्यांना मते जुळविण्याचा अनुभव आहे. तर पवार यांना लोक जुळविण्याचा. त्यामुळे वर्चस्वाच्या या लढाईत कुणाची वेळ साधणार, हे वेळच ठरवणार आहे.
पेठेंचा फोटो काढला अन् दरी वाढली
- पक्षफुटीनंतर पेठे व पवार या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर व्यक्तिगत टीका करणे टाळले होते. मात्र, काचिपुरा येथील जनसंपर्क कार्यालयात लागलेले जयंत पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग यांच्यासह दुनेश्वर यांचा फोटोही प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आला. या घटनेमुळे पेठे दुखावले. तेव्हापासून या मित्रांमध्ये दरी वाढत गेली.