नागपूर: सरकारी यंत्रणा लोकसभा निवडणुकीत गुंतल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. केवळ सहा दिवसात तुरीचे दर प्रति क्विंटल दोन हजारांनी वाढून दर्जानुसार ११ ते १२ हजारांवर पोहोचले. त्यानुसार तूर डाळीचे दर १५० ते १७५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब झाले आहे.
कळमना धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे म्हणाले, कळमन्यात गेल्या आठवड्यात तुरीचे दर अचानक वाढायला लागले. १० हजारांचे दर (प्रति क्विंटल) १२ हजारांवर पोहोचले. दरदिवशी ३ ते ४ हजार पोत्यांची आवक होत आहे. शिवाय चण्याचे दर प्रति क्विंटल ३०० रुपयांनी वाढून ५,५०० ते ५,८५० रुपयांवर पोहोचले. ४ ते ५ हजार चण्याच्या पोत्याची आवक आहे. सोयाबीनचे दरही प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी वाढून ४ हजार ते ४,४५० रुपयांवर गेले आहेत. दररोज ८०० ते एक हजार पोते विक्रीसाठी येत आहेत.
कळमना धान्य बाजारातील घाऊक व्यापारी रमेश उमाटे म्हणाले, तूर आणि चण्याचे दर वाढल्याने तूर डाळ आणि चणा डाळीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवड्यात तूर डाळीचे दर दर्जानुसार प्रति किलो १५० ते १७५ रुपये तर चणा डाळी ७२ ते ७७ रुपयांदरम्यान विकली जात आहे. पुढे भाव किती वाढतील, हे आता सांगणे कठीण आहे.