मोरेश्वर मानापुरे नागपूर : इंडिगो एअर लाइन्सचे नागपुरातून पुणे जाणाऱ्या विमानाला सोमवारी दुपारी नागपूर विमानतळावर आकस्मिक लॅण्डींग करावे लागले. हे विमान आकाशात उडताच पक्षाने विमानाला धडक दिली. त्यानंतर पायलटने तातडीने विमान धावपट्टीवर उतरविण्याचा निर्णय घेतला. विमान तातडीने माघारी फिरल्याने मोठी दुर्घटना टळली. या विमानातील प्रवाशांना एक तासानंतर दुसऱ्या विमानाने पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दुपारी इंडिगोचे ६३१३५ नागपूर-पुणे विमान पक्षाने धडक दिल्याच्या कारणाने रिजेक्ट टेकऑफमध्ये सामील झाले आहे. सध्या हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. या विमानाच्या इंजिनात बिघाड आला आहे. या विमानाच्या इंजिनात आधीच बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे विमान पुणेहून नागपुरात उशिरा पोहोचले होते.
विमानतळावर धावपट्टीवरून धावतात हरीण, जंगली डुक्करनागपूर विमानतळाच्या धावपट्टीवरून अनेकदा हरीण, जंगली डुक्कर आणि पाळीव प्राणी जाण्याच्या घटनांची नोंद आहे. या प्रकरणी इंडिगो एअरलाइन्स आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबाबत एक दुसऱ्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. धावपट्टीच्या बाजूला लावण्यात आलेली साऊंड गन विमान आकाशात झेपावण्याआधी पक्षांना बाजूला उडविण्याचे काम करते. सोमवारी या उड्डाणावेळी साऊंड गनचा उपयोग केला होता वा नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुंबई जाणारे विमान पुण्याला पाठविले; मुंबईच्या प्रवाशांची असुविधा
सोमवारी दुपारी १ वाजता पुण्याकडे आकाशात झेपावलेले इंडिगोच्या विमानाचे आकस्मिक लॅण्डींग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पुण्याला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. याकरिता मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना उतरविण्यात आले आणि त्यांच्या जागेवर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना बसविण्यात आले. या विमानाने दुपारी ४ वाजता नागपूर विमानतळावरून पुण्याकरिता उड्डाण केले. दुसरीकडे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागला. यादरम्यान इंडिगोने प्रवाशांना सायंकाळी ६ च्या विमानाने मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.