नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही आता उमेदवारांमधील लढतीपुरती मर्यादित राहिली नसून नेत्यांच्या प्रतिष्ठेपर्यंत पोहोचली आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीत राखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ताकदीने प्रचारात उतरले आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडविण्याचा चंग बांधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांनी शक्ती पणाला लावली आहे. यामुळे उमेदवार निवडणूक लढत असले तरी खरी लढत नेत्यांमध्येच होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भाजपने शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना उशिरा समर्थन दिले. तर काँग्रेसनेही बऱ्याच घोळानंतर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर केले. दोन्ही पक्षांच्या समर्थनानंतर शिक्षक संघटनांपुरती मर्यादित असलेली ही लढाई हळूहळू नेत्यांच्या लढाईत परावर्तीत झाल्याचे दिसून आले. फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवारांनी भाजपचा मोर्चा सांभाळला. तर आ. मोहन मते यांच्यासह प्रवीण दटके, परिणय फुके, पंकज भोयर आदींनी निवडणूक अंगावर घेतली. काँग्रेसकडून पटोले, केदार, वडेट्टीवार यांनी सूत्रे हाती घेतली. तर माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, डॉ. बबनराव तायवाडे, माजी आ. विश्वनाथ डायगव्हाणे यांनी मतदारांची जुळवाजुळव करण्यासाठी जोर लावला आहे. निवडणूक तीन दिवसांवर आली असताना दोन्ही पक्षातील सर्वच नेते मतदार शिक्षकांसह संस्थाचालकांच्या भेटीत व्यस्त आहेत.
आंबेडकरांसह कपिल पाटीलही लावताहेत जोर
- वंचित बहुजन आघाडीकडून दीपककुमार खोब्रागडे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर येऊन गेले. त्यांनी संबंधित संघटनांपर्यंत निरोप पोहोचवले. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्यासाठी आ. कपिल पाटील यांनीही जोर लावला. आ. पाटील हे स्वत: शिक्षक संघटनांच्या संपर्कात आहेत. बसपाच्या निमा रंगारी यांच्यासाठी प्रदेश महासचिव नागोराव जयकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे कॅडर कामी लागले आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार देवेंद्र वानखेडे यांच्यासाठी ‘आप’चे कॅडर शिक्षकांच्या भेटी घेत दिल्लीतील एज्युकेशन मॉडेल मांडत आहेत.