नागपूर/सावनेर : प्लाॅटच्या गुंठेवारीसाठी २० हजार रुपयांची लाच मागणारा सावनेर नगरपालिकेचा कर व प्रशासकीय अधिकारी तसेच काॅम्प्युटर ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई सावनेर नगरपालिका कार्यालयाच्या आवारात साेमवारी (दि. १३) सायंकाळी करण्यात आली.
सचिन विठ्ठलराव पडलवार (३१) व शेखर गोविंदरावजी धांडोळे (३४) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखाेर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सचिन पडलवार हा नगरपालिकेत प्रभारी कर व प्रशासकीय अधिकारीपदी तर शेखर धांडोळे हा कंत्राटी काॅम्प्युटर ऑपरेटरपदी कार्यरत आहे. तक्रारकर्ता हा सावनेर शहरातील रहिवासी असून, त्यांच्या पत्नीच्या नावे प्लाॅट आहे. त्या प्लाॅटची गुंठेवारी काढायची असल्याने त्यांनी पालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केला हाेता.
सचिन पडलवार याने तक्रारकर्त्याला या कामासाठी २० हजार रुपयांची मागणी केली हाेती. शिवाय, ही रक्कम शेखरकडे देण्याची सूचनाही केली हाेती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने ‘एसीबी’च्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली. त्याअनुषंगाने ‘एसीबी’ने साेमवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेखरने रक्कम स्वीकारताच ‘एसीबी’च्या पथकाने दाेघांनाही ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी सावनेर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पाेलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पाेलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या पाेलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पाेलिस निरीक्षक प्रवीण लाकडे व प्रीती शेंडे, शिपाई सारंग बालपांडे, गीता चौधरी, करुणा सहारे, दीपाली भगत, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.