नागपूर : चुलत बहिणीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तरुणाचा खून करणाऱ्या भावाची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. ही घटना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहे.
अल्पेश सदानंद टेंभुर्णे (२५) असे आरोपीचे नाव आहे. मृताचे नाव शशांक करवाडे होते. शशांक व अल्पेशची चुलत बहीण मयूरी लग्न करणार होते. दरम्यान, शशांकने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मयूरीने आत्महत्या केली. परिणामी, अल्पेशचे कुटुंबीय शशांक व त्याच्या कुटुंबीयांचा राग करायला लागले. त्यांनी शशांक व त्याच्या आई-वडिलांविरुद्ध मयूरीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची तक्रारही नोंदविली होती. सत्र न्यायालयाने त्या प्रकरणात शशांक व त्यांच्या आई-वडिलांची निर्दोष सुटका केली. त्यानंतरही अल्पेशच्या मनातील खदखदत कायम होती. तो शशांकसोबत सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालत होता. त्यातूनच त्याने २७ मार्च २०१७ रोजी शशांकचा धारदार चाकूने सपासप वार करून खून केला.
अपील फेटाळले
२६ सप्टेंबर २०१८ रोजी सत्र न्यायालयाने अल्पेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध अल्पेशने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता ते अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.