नागपूर : ‘जीएस’ महाविद्यालयातील प्राध्यापक गजानन कराळे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप लावण्यात येत होते. त्यांच्या जावयाच्या तक्रारीवरून अखेर पोलिसांनी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एन. वाय. खंडाईत यांच्यासह शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आत्महत्येमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली होती.
जीएस कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले ४५ वर्षीय गजानन कराळे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी डायरीत सुसाईड नोटही लिहिली असून, कॉलेज व्यवस्थापनाच्या छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले. सुसाईड नोटमध्ये पाच-सहा प्राध्यापकांची नावे लिहिली होती. कराळे यांचे जावई नीलेश रोंघे यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली व त्यानंतर माजी प्राचार्य एन. वाय. खंडाईत, बच्चू पांडे, भावना गट्टूवार, तौसिक पठाण यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कराळे यांच्या नोकरीला १२ वर्षे झाली होती. वरिष्ठ वेतनश्रेणी मिळविण्यासाठी १२ वर्षांनंतर पात्रता परीक्षा घेतली जाते. कराळे सोमवारी परीक्षेला बसणार होते. कॉलेज व्यवस्थापनाशी संबंधित शिक्षकांकडून त्यांना बऱ्याच दिवसांपासून धमक्या येत होत्या. कराळे यांचा एका महिला प्राध्यापकाशी वाद झाला. याप्रकरणी कराळे यांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. त्यांना सुटी घेण्यासदेखील मनाई करण्यात येत होती. यातून कराळे तणावात होते व अखेर त्यांनी त्यातूनच टोकाचे पाऊल उचलले.
कराळेंचा कुणी पाठलाग करत होते का?
कराळे यांनी आत्महत्येअगोदर त्यांच्या जावयाला फोन केला होता. त्या वेळी काही लोक माझ्या घराकडे पाहत आहेत व मला त्यांची भीती वाटत आहे, असे त्यांनी रोंघे यांना सांगितले होते. तसेच रोंघे यांच्या पत्नीने कराळेंच्या पत्नीसोबत घरात प्रवेश केला असता कराळे यांच्या डोक्याला मार लागला होता व दोन ठिकाणी रक्त असल्याचे दिसून आले. त्यांचा खरोखर कुणी पाठलाग करत होते का व त्यांना नेमका मार कशाचा लागला ही बाब कोड्यात टाकणारी आहे.
खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक दबावात
केवळ ‘जीएस’ महाविद्यालयच नाही तर नागपुरातील अनेक खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक विविध दबावांखाली व तणावात काम करत आहेत. विशेषत: व्यवस्थापनाकडून वाढलेल्या अपेक्षा व कामाचा बोझा यामुळे अनेक प्राध्यापक ताणात आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे प्रमाण यात जास्त आहे. अध्यापन, परीक्षेची कामे यांच्याव्यतिरिक्त शिक्षकांकडून कारकुनी कामेदेखील करवून घेतली जात आहे.