नागपूर : न्यायालयाचे निर्देश व परवानगी नसतानाही पोलिसांनी शहराच्या विविध भागातून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यासह सुमारे अडीच हजार जणांना ताब्यात घेतले होते. मेश्राम यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी एसआरपीसह पाच हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. लोकांना संयमाने नियंत्रित करण्याच्या सूचना दिल्या. क्यूआरटीच्या ८ तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या.
वामन मेश्राम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, मनाई आदेशांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आयोजकांनी सुरुवातीला बेझनबाग ते बडकस चौकापर्यंत मोर्चा काढण्याचे सांगितले होते, तर सोशल मीडिया आणि पोस्टर्समध्ये संघ मुख्यालयाचा घेराव करण्याचे लिहिले होते. नागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ६ ऑक्टोबरऐवजी इतर दिवशी मोर्चा काढण्याची विनंती केली होती. पोलिसांना आंदोलकांशी चर्चेची भूमिका घेतली होती. उच्च न्यायालयात याचिका रद्द झाल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी जरीपटका, पाचपावली, कोतवाली व तहसील पोलीस ठाण्याच्या परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश देऊन ५५ जणांना नोटिसा बजावल्या. लाऊडस्पीकरवर चारपेक्षा जास्त लोक एकत्र न करण्याचे जाहीर केले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
पोलिसांचा आंदोलकांवर ‘वॉच’
आयोजक अद्याप सर्वोच्च न्यायालयात गेलेले नाहीत. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. संघ मुख्यालयावर हल्ला बोल करण्याचे आयोजक सुरुवातीपासूनच म्हणत होते. कलम १९ चा वापर खासगी संस्था-संस्थेवर मोर्चा काढण्यासाठी केला जाऊ शकत नाही. आयोजकांच्या भूमिकेवर पोलिस लक्ष ठेवून आहेत, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच पोलीस कारवाई : उपमुख्यमंत्री
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र दिवशी लाखो लोक नागपुरात येतात. परंतु कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. यंदा काही जणांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. हे योग्य नाही. न्यायालयानेही याचाच विचार करून कदाचित आदेश दिले असावे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस कारवाई करीत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.