नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) संघर्ष यात्रेत गोंधळ घालणाचा ठपका ठेवत पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह ६७ जणांवर सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली संघर्ष यात्रा मंगळवारी सायंकाळी मॉरिस कॉलेज टी पॉइंटजवळ संपली. तेथे बैठक झाली. सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विधानभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी घोषणाबाजी केली. मंत्र्यांनीच येऊन आमचे निवेदन स्वीकारावे या मागणीवर आंदोलक अडून बसले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केल्याने तणाव निर्माण झाला होता.
नेते व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली. पोलिसांनी पेठे यांच्यासह ६७ जणांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या निदर्शनात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अनेक आमदार आणि बडे नेते सहभागी झाले होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.