लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खोटी बिले सादर करत तीन दुकानदारांसोबत व्यवहार करून शासनाची साडेसात लाखांनी फसवणूक करणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
उज्वला ढोके (अंबाझरी) असे आरोपी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प, नागपूर ग्रामीण पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पाच अंगणवाडी केंद्रांना श्रेणीवर्धन करण्याबाबत त्यांच्याकडे जबाबदारी होती. १६ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान त्यांनी गैरव्यवहार करून पुरवठाधारक दुकानदारांशी व्यवहार केले. त्यात यवतमाळ येथील श्री बुक डेपो ॲंड जनरल स्टोअर्स, नागपुर येथील ऋषाली एम्पोरिअम व नागपुरातील शांभवी एज्युकेशन यांचा समावेश होता. या दुकानदारांनीदेखील खोटी बिले सादर करत व्यवहार केले. या चारही आरोपींनी शासनाची ७.५१ लाखांची फसवणूक केली. जि.प.चे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल मनोहरराव जाधव (५१) यांच्या तक्रारीनंतर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.