नागपूर : एरवी विनापरवानगी झाडे तोडल्यावर मनपाकडून सामान्य नागरिकांविरोधात कारवाई करण्यात येते व काही वेळा पोलिसांत तक्रारदेखील करण्यात येते. मात्र नागपूर महानगरपालिकेच्याच उद्यान अधीक्षकांना एका पर्यावरण तज्ज्ञाने दणका दिला आहे. नियमबाह्य पद्धतीने अजनी चौकातील झाडे तोडल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी या प्रकरणात उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे मनपात दिव्याखालीच अंधार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
सचिन खोब्रागडे असे तक्रारदाराचे नाव आहे. ते मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य होते. १३ डिसेंबर रोजी अजनी चौकातील क्लॉक टॉवरसमोर सौंदर्यीकरण सुरू होते. कडुनिंबाचे एक झाड पाच फुटांपासून वर कापलेल्या अवस्थेत होते. खोब्रागडे यांनी मनपाच्या लाईव्ह सिटी या ॲपवर तक्रार केली. १६ डिसेंबर रोजी परत केशिया जातीचे तीन झाडेदेखील अशाच पद्धतीने तोडलेली दिसून आले. याबाबतदेखील खोब्रागडे यांनी ॲपवर तक्रार केली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. उद्यान अधीक्षक कार्यालयातूनदेखील उत्तर देण्यात आले नाही. माहिती अधिकारातून त्यांना अक्षय एन्टरप्रायझेस या कंत्राटदाराला झाडे कापण्याचे कंत्राट मिळाल्याचे कळाले.
उद्यान अधीक्षक चोरपगार यांनी केशिया झाडांची पाच फुटांच्या वर पूर्ण कापणी करण्याबाबत व कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या छाटण्याबाबत परवानगी दिली होती. मात्र नियमांनुसार उद्यान अधीक्षकांना केवळ झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी देण्याचे अधिकार आहेत. याची माहिती असतानादेखील चोरपगार यांनी झाडे कापण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात खोब्रागडे यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमोर चोरपगार, उद्यान निरीक्षक अनुप बाडेबुचे व अक्षय एंटरप्रायझेसविरोधात महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.