लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध मागण्यांसाठी आंदोलन करत रास्ता रोको करणाऱ्या गोवारी समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशन काळात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र एक महिना उलटल्यावरदेखील सरकारकडून काहीच पावले उचलण्यात न आल्याने समितीचे कार्यकारी संयोजक रामदास नेवारे यांच्या नेतृत्वात सचिन चचाने, चंदन पोहरे, किशोर चौधरी हे २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसले. सरकारकडून याचीदेखील दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप करत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी संविधान चौकात आंदोलनाची हाक दिली. राज्यभरातील २० हजाराहून अधिक गोवारी समाजातील नागरिक नागपुरात पोहोचले. त्यानंतर आंदोलकांनी विविध चौकांमध्ये रास्ता रोको सुरू केला. यामुळे शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. अनेक रुग्णवाहिका, स्कूल बसदेखील गर्दीत बराच वेळ अडकल्या होत्या.
आंदोलकांनी एमएच १४ सीएल ११२४ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची तोडफोडदेखील केली. सरकारी अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दाखविली. मात्र तरीदेखील रात्री साडेनऊ वाजेपर्यंत रास्तारोको सुरूच होता. विनापरवानगी रास्ता रोको करणे, शासकीय वाहनाचे नुकसान करून मारहाण करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक कायद्यातील कलमांचादेखील समावेश आहे. पोलिसांनी कैलास राऊत, रामदास नेवारे, अनिल राऊत, अरुणा चचाने, सविता नेवारे, छाया राऊत, अश्विन राऊत, रुपेश ब्रम्हपुरी, विजय चौधरी, माहेश्वरी नेवारे, अमोल गजभिये, वीर वहारे, विकास लसुंते, हेमराज राऊत यांच्यासह २ हजार आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.