नागपूर: एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात युवकांच्या दोन टोळ्यात भांडण होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात दोन आरोपी आणि त्यांच्या सोबतच्या विधीसंघर्षग्रस्त बालकांनी चाकुने वार करून एका युवकाला गंभीर जखमी केले. प्रतापनगर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
प्रियांशु उत्तम चव्हाण (२१), आदी अनिल समुद्रे (२१) आणि त्यांचे दोन साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक सर्वजण रा. बारा सिग्नल ईमामवाडा अशी आरोपींची नावे आहेत. तर योगेश बंडु नंदनवार (१७, रा. साईनगर दिघोरी रोड हुडकेश्वर) असे गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. २३ जूनला सकाळी ८.३० वाजता एका खासगी संस्थेने प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामभंडार दुकानासमोर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी योगेश हा त्याचे मित्र हर्ष, आर्यन व प्रेम यांच्यासह गेला होता.
कार्यक्रमाच्या ठिकाणी योगेश व त्याचे मित्र उभे असताना त्यांच्या बाजुला काही मुलांचे भांडण झाले. त्यातील एका गटातील मुले तेथून पळून गेली. थोड्या वेळानंतर आरोपी प्रियांशु व आदी हे आपले दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत तेथे आले. त्यांना योगेश व त्याचे मित्र पळून गेलेल्या युवकांचे साथीदार असल्याचा गेरसमज झाला. त्यामुळे आरोपींनी योगेशला शिविगाळ करून मारहाण सुरु केली. एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने आपल्याजवळील चाकुने योगेशच्या डोळ्यावर, छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी योगेशला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. योगेशने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.