नागपूर : येत्या ३१ ऑगस्ट राेजी खगाेलप्रेमींना ‘सुपर ब्ल्यू मून’चे दर्शन घडणार आहे; पण त्यापूर्वी अंतराळातील आणखी एक सुंदर अशा ‘शनी’ ग्रहाचे दर्शन नागरिकांना करता येईल. २७ ऑगस्टला शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. ग्रहाभाेवती गाेल फिरणाऱ्या वादळी कड्यांमुळे अतिशय विलाेभनीय असलेल्या शनी ग्रहाला दुर्बिणीने पाहण्याची संधी अवकाश निरीक्षक, अभ्यासक व खगाेलप्रेमींना मिळणार आहे.
शनी हा सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह होय. शनीच्या भोवतीने असलेल्या कड्यामुळे शनीचे वेगळेपण खुलून दिसते. २७ ऑगस्टला शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आणि अगदी सूर्यासमोर राहील. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास शनी व पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते. तथापि ही कडी साध्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. त्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल.
२७ ऑगस्ट रोजी सूर्य मावळल्यानंतर लगेच शनी ग्रह हा पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसेल. हा ग्रह रात्रभर काळसर व पिंगट रंगाचा व चमकदार दिसेल. त्यामुळे हा ग्रह ओळखता येईल. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
ऑगस्ट महिन्यात आपला चंद्र दुसऱ्यांदा पृथ्वीच्या अगदी जवळ राहणार आहे. पहिल्यांदा १ ऑगस्ट राेजी पाैर्णिमेला ताे जवळ हाेता. एकाच महिन्यात दाेनदा पाैर्णिमा असल्याने त्यास ‘सुपरमून’ संबाेधले जाते. ३१ ऑगस्टचा चंद्र हा ‘सुपर ब्ल्यू मून’ असेल.
शनीची वैशिष्टे
- शनी ग्रहाचा व्यास १.२० लाख किमी व तापमान शून्याखाली १८० अंश सेल्सिअस आहे. ग्रहाभाेवती वादळाचे गाेल कडे तयार झाले आहेत, ज्यामुळे ताे अत्याकर्षक वाटताे.
- ही बर्फाची वादळी कडे चक्क २.७० लाख किमीपर्यंत पसरली असतात. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे.
- या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा करायला २९.५ वर्षे लागतात. शनीला एकूण ८२ चंद्र आहेत व टायटन हा त्याचा सर्वांत माेठा चंद्र हाेय.