- दयानंद पाईकराव नागपूर - स्वस्त धान्याचे दुकान फोडून दुकानातील गहु, तांदुळ, सीसीटीव्ही असा ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पाचपावली पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विधांशु उर्फ दद्दु रुपेश उर्फ बबलु रोकडे (१९) आणि आदित्य उर्फ तन्मय संदिप लोखंडे (१९) दोघे रा. ज्ञानदिप बुद्ध विहाराजवळ, बाळाभाऊपेठ, पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बुधवारी १५ मे रोजी सायंकाळी ७.३० ते गुरुवारी १६ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान बाळाभाऊपेठ येथील मनोज ग्राहक सहकारी संस्था नावाचे स्वस्त धान्याचे दुकान फोडले होते. आरोपींनी दुकानातील २० क्विंटल तांदळाची पोती, १० क्विंटर गव्हाची पोती, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर असा‘ुण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी शुभांगी सतिश वांधे (३९, रा. फ्रेंड्स कॉलनी चौक, गिट्टीखदान) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४५७, ३८०, ४११ नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याच्या तपासात पाचपावली ठाण्याचे अधिकारी, अंमलदारांनी तांत्रीक तपास व मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विधांशु व आदित्यता ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही दुकान फोडल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून ३० पोते तांदुळ, सायकल ट्रॉली, सीसीटीव्ही कॅमेरा, मेमरी कार्ड असा एकुण ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर भोगे, ईमरान शेख, रोमेश मेनेवार, राहुल चिकटे, गगन यादव, संतोष शेंद्रे, महेंद्र सेलोकर यांनी केली.