कोंबड्यांची झुंज गेली उच्च न्यायालयात, बुधवारी सुनावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:13 AM2022-09-20T06:13:22+5:302022-09-20T06:14:03+5:30
देशामध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम-१९६० लागू झाल्यापासून कोंबडा झुंजी आयोजित करण्यावर बंदी आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यामध्ये कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, याकरिता शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र व राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.
देशामध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम-१९६० लागू झाल्यापासून कोंबडा झुंजी आयोजित करण्यावर बंदी आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये पारंपरिक पद्धतीने कोंबडा झुंज आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली होती. झुंजीत धारदार ब्लेड, जुगार व सट्टा लावण्यास मनाई करण्यात आली होती. २०१९ मध्ये आंध्र प्रदेश येथे कोंबडा झुंजीत केवळ तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ही बाब लक्षात घेता, कोंबडा झुंजी अधिकृत केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच या खेळामुळे कुकुटपालन व कोंबड्यांचे देशी वाण संरक्षित करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा दावा चाचरकर यांनी केला आहे.