प्रवीण खापरे
नागपूर : ‘मानव्यशास्त्रातील ज्ञानाची साधने’ या अध्ययन विशेषांकाच्या नावाखाली रेणुका कॉलेजच्या विशेषांक संपादक मंडळाने, पुणे येथील ‘मराठी अभ्यास परिषदे’द्वारे काढल्या जाणाऱ्या ‘भाषा आणि जीवन’ या नियतकालिकाची प्रतिष्ठा चोरत, साहित्य क्षेत्रात स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
बऱ्याच संस्था, संघटना, महाविद्यालये विशिष्ट तिथीला अनुसरून विशेषांक / ऑनलाइन विशेषांक काढत असतात. असे करताना ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडिया (आरएनआय)’कडे रीतसर नोंदणी करावी लागते. किंवा अन्य संस्थेकडे असलेल्या नोंदणी क्रमांकाच्या आधारावर कोणत्याही संस्थेस एखादा विशेषांक काढण्याचे प्रचलनही आहे. मात्र, त्यासाठी, संबंधित संस्थेची किंवा नियमित निघत असलेल्या नियतकालिकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, रेणुका कॉलेजच्या प्राध्यापक मंडळींकडून २०२१ मध्ये ‘मानव्यशास्त्रातील ज्ञानाची साधने’ या शीर्षकाखाली काढण्यात आलेल्या विशेषांकात अशा प्रकारचे कसलेही दंडक पाळण्यात आलेले नाही. हा विशेषांक काढताना कॉलेजच्या विशेषांक संपादक मंडळाने ‘भाषा आणि जीवन’चे शीर्षक, ‘आरएनआय’नोंदणी क्रमांक आणि नियतकालिकाची प्रतिष्ठा चोरल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, शीर्षकात ‘मानव्यशास्त्रातील ज्ञानाची साधने’लाही स्थान देण्यात आलेले नाही. हा अंक जेव्हा ‘मराठी अभ्यास परिषदे’च्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी, या विरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली तेव्हा महाविद्यालय त्रयस्थ व्यक्तीकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अंकात अंतर
- २०२१च्या ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये काढण्यात आलेल्या या अंकाचे ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कॉपी, अशा दोन स्वरूपात विशेषांक आहेत. या दोन्ही अंकामध्ये फरक असून, ऑनलाइन विशेषांकात अतिथी संपादक म्हणून रेणुका कॉलेजचे तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. अतुल महाजन व सह अतिथी संपादक म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ. कैलास फुलमाळी यांचा उल्लेख आहे. सोबतच त्यांचे व प्राचार्य डॉ. ज्योती पाटील यांचे मनोगत आहे. प्रत्यक्ष कॉपीमध्ये ही पाने गहाळ करण्यात आली आहेत.
माझी फसवणूक झाली!
- या प्रकरणात चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रफुल्ल राजुरवाडे यांनी उडी घेत थेट ‘भाषा आणि जीवन’च्या संपादक मंडळाकडे लेखी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. या अंकासाठी वैभव सूर्यवंशी या इसमाला संपूर्ण लेख व अंक काढण्यासाठी रेणुका महाविद्यालयाने दिलेले ५५ हजार रुपये पाठविण्यात आल्याचे त्यांनी कबूल केले आहे. मात्र, सूर्यवंशीने थेट ‘भाषा आणि जीवन’च्या अंकाचाच वापर करत, त्याबद्दल आम्हाला कसलीही माहिती दिली नसून, त्यानेच माझी व महाविद्यालयाची फसवणूक केल्याचा आरोप राजुरवाडे यांनी केला आहे.
आम्ही या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन चौकशी करत आहोत. शहानिशा होताच, संबंधितांविरोधात जी काही पाऊल उचलता येतील, ती त्वऊले निश्चित उचलली जातील.
- सलील वाघ, अध्यक्ष - मराठी अभ्यास परिषद, पुणे
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्रतिष्ठित नियतकालिकाचा बनावट अंक प्रसिद्ध करणे, हे अतिशय धोकादायक आणि अनैतिक कृत्य आहे. अशाने शिक्षक आणि शिक्षणसंस्था संशयाच्या भोवऱ्यात येतील.
- डॉ. आनंद काटीकर, संपादक - भाषा आणि जीवन