नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर आता केवळ २० रुपयांत प्रवाशांना जेवण मिळणार आहे. एका टोकाहून दुसऱ्या टोकावरचा लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या गोरगरिब प्रवाशांना खास करून रोजगाराच्या शोधात आपला गाव, आपला प्रांत सोडणाऱ्या प्रवाशांना नजरेसमोर ठेवून भारतीय रेल्वेने हा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे.
पुरेसा आणि सलग रोजगार नसल्याने राब राब राबूनही अनेकांना दोन वेळेच्या जेवणांची सोय होईल, एवढे पैसे मिळत नाही. अनेक प्रांतात वर्षातील काही दिवसच रोजगार मिळतो. त्यामुळे ही मंडळी दोन वेळेची पोटाची सोय व्हावी म्हणून रोजगाराच्या शोधात निघतात. यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड सारख्या प्रांतातील काही भागात राहणारी मंडळी नेहमीच महाराष्ट्रात आणि अन्य प्रांतात कामाच्या शोधात येताना दिसते. त्यांच्याकडे रेल्वेचे तिकिट असले तरी लांब अंतराच्या प्रवासात खाण्यापिण्याचे महागडे पदार्थ घेण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे शेकडो किलोमिटरचा प्रवास ही मंडळी उपाशी किंवा अर्धपोटी राहून करतात. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या रामसेवक भूईया नामक अशाच एका मजुराचा उपाशीपोटी प्रवास केल्याने बेंगळुरू - दानापूर संघमित्रा एक्सप्रेसमध्ये मृत्यू झाला होता. उघड झालेली नागपूर स्थानकावरची ही एक घटना आहे. मात्र, अशा अनेक घटना वेळोवेळी समोर येते. हे डोळ्यासमोर ठेवून भारतीय रेल्वे प्रशासनाने अत्यंत स्वस्त किंमतीत प्रवाशांना जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन पर्याय उपलब्ध
अत्यंत माफक दरात जेवणाचे दोन पर्याय प्रवाशांना उपलब्ध राहणार आहेत. पहिल्या पर्यायात ७ पुरी आणि आलूची सुकी भाजी मिळणार आहे. त्यात चवीसाठी लोणचेही आहे. एकण १७५ ग्राम वजनाचे हे जेवण फक्त २० रुपयांत मिळणार आहे. तर, दुसऱ्या जेवणाची किंमत ५० रुपये राहणार असून त्यात दक्षिण भारतीय बनावटीचा भात, राजमा किंवा छोले भात किंवा खिचडी, कुलछे, छोले भटूरे किंवा पाव भाजी किंवा मसाला डोसा असे हे पदार्थ असून, यातील कोणताही एक पर्याय जेवणाचा पदार्थ ५० रुपयांत तुम्ही घेऊ शकता. एका पेक्षा अनेक प्रकारचे खाद्याचे प्रकार घेतल्यास प्रत्येक पदार्थाला तेवढीच ५० रुपयांची रक्कम वेगळी द्यावी लागणार आहे.
नागपुरात सुरू, महाराष्ट्रात तीन दिवसांत सुरू होणार
जेवणाची ही सुविधा महाराष्ट्रातील नागपूर रेल्वे स्थानकावर आजपासून ही सुविधा सुरू झाली. तर, एलटीटी मुंबई, पुणे, मनमाड आणि भुुसावळ तसेच खंडवा रेल्वे स्थानकांवर या लकवरच सुरू होणार आहे. फलाटावर रेल्वे डब्याच्या अगदी समोर हे जेवणाचे स्टॉल राहणार असून तेथून विकत घेऊन प्रवासी त्यांच्या आसनावर बसून या जेवणाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. या शिवाय अन्य रेल्वेस्थानकांवरही लवकरात लवकरच ही जेवणाची व्यवस्था सुरू केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी म्हटले आहे.