नागपूर : कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनी थर्ड सेमिस्टरच्या परीक्षेत तीन विषयात नापास झाली. या धक्क्यामुळे तिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी ३० एप्रिलला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान ती एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आत्महत्येमुळे आईवडिलांच्या पायाखालील वाळु सरकली अन् त्यांनी एकच टाहो फोडला.
गौरी सुनिल भावेकर (वय २१, रा. लुनावतनगर, धामनगाव रेल्वे, अमरावती) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती. गौरीचे वडिल शिक्षक असून आई गृहिणी आहे. गौरी कॉम्प्युटर सायन्सच्या सेकंड ईयरला शिकत होती. ती प्रियदर्शिनी गर्ल्स होस्टेलच्या खोली क्रमांक २१३/ए मध्ये दोन मेत्रीणींसोबत राहत होती.
नुकताच गौरीच्या थर्ड सेमिस्टरचा निकाल लागला होता. यात ती तीन विषयात नापास झाली. तर तिच्या खोलीतील दोघीही मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. नापास झाल्यामुळे गौरी तणावात होती. दरम्यान रविवारी सायंकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान तिच्या खोलीतील दोन्ही मेत्रीणी दुसऱ्या खोलीत गेल्या होत्या. तेवढ्यात गौरीने आपल्या खोलीत सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी होस्टेलच्या वॉर्डन अर्चना संदेश बुरबुरे (वय ५०) यांनी दिलेल्या सुचनेवरून प्रतापनगर ठाण्याचे उपनिरीक्षक निलेश कुलसंगे यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल हॉस्पीटलमध्ये पाठविला. गौरीने आत्महत्या केल्याची बाब तिच्या आईवडिलांना समजताच त्यांच्या पायाखालील वाळू सरकली.
गौरी असे टोकाचे पाऊल उचलेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. तिच्या आईवडिलांनी एकच टाहो फोडला. जड अंतकरणाने ते मुलीचा मृतदेह घेऊन आपल्या गावाकडे परतले.