खापरखेडा (नागपूर) : निरुपयोगी साहित्य हाताळत असताना कंत्राटी कामगार ५० फूट उंचीवरून खाली काेसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) औष्णिक वीज केंद्राच्या आवारात शुक्रवारी (दि. २६) दुपारी २.१५ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली.
बंडू ऊर्फ मधुकर विठ्ठल लांडे (४०, रा. राेहणा, ता. सावनेर) असे मृत कामगारांचे नाव आहे. ते ओरियन इंडस्ट्रीस नामक कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे. बंडू शुक्रवारी दुपारी खापरखेडा वीज केंद्रातील ५०० मेगावॅट वीज निर्मिती संयंत्रातील काेळसा हाताळणी विभागाच्या क्रशर हाऊसमध्ये निरुपयोगी साहित्य हाताळत हाेते. त्यांच्यासाेबत आणखी दाेन कामगार हेच काम करीत हाेते. निरुपयोगी साहित्य फेकत असताना बंडू लांडे ५० फूट उंंचावरून खाली काेसळल्याने गंभीर जखमी झाले. वीज केंद्र प्रशासनाने त्यांना लगेच जखमी अवस्थेत नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. मेयाे रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया पार पडल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
सुरक्षात्मक उपाय याेजनांचा अभाव
ही कामे धाेकादायक असताना कंपनी अथवा प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही उपाययाेजना केल्या नाही. शिवाय, ही कामे विना परमिट असल्याचा आराेप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणात सुपरवायझर व इतर दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय, वीज केंद्राच्या सीएसआर फंडातून मृताच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्यांच्या पत्नीला वीज केंद्रा नाेकरी देण्याची मागणी कामगारांनी केली असून, शनिवार (दि. २७) पासून वीज केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.