नागपूर :काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत शेगाव येथे सहभागी होण्यासाठी नागपूर शहर काँग्रेसचा अडीच हजारावर कार्यकर्त्यांचा ताफा गुरुवारी सकाळी रवाना झाला. ‘नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा बुलंद करीत कार्यकर्त्यांनी यात्रेत जोश भरला.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ताफा राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी शेगाव येथे रवाना झाला. यात ५१ बस व ५० हून अधिक खासगी कारचा समावेश होता. कार्यकर्त्यांनी सोबत ढोलकी व डफली आणली होती. ते देशभक्ती गीत गाऊन उत्साह वाढवत होते. आ. अभिजित वंजारी, प्रदेश सचिव गिरीश पांडव, प्रदेश प्रतिनिधी प्रशांत धवड, नगरसेवक संजय महाकाळकर, संदीप सहारे, विवेक निकोसे, हरीश ग्वालबंसी, युवक काँग्रेसचे महासचिव केतन ठाकरे, अरुण डवरे यांच्यासह सुमारे अडीच हजार कार्यकर्ते रवाना झाले.
खांद्यावर तिरंगा, डोक्यावर गांधी टोपी
- बहुतांश कार्यकर्ते खांद्यावर तिरंगा, डोक्यावर गांधी टोपी व गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा घालून यात्रेत सहभागी झाले. काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या टी शर्ट धारण केल्या होत्या. सर्व गाड्यांवर ‘भारत जोडो’चे बॅनर व काँग्रेसचे झेंडे लागले होते.
महिला व ज्येष्ठांचा समावेश
- यात्रेत महिलांसह ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले. शेगाव येथे लाखो लोक येतील, गर्दी असेल याची जाणीव असतानाही आपले नेते राहुल गांधी यांच्यासह चार पावले चालण्यासाठी महिला कार्यकर्त्या उत्सुक होत्या.
कन्हैय्या कुमारच्या ‘आझादी’ गाण्याची धूम
- युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रुझवान रुमवी, सत्यम सोदगीर, प्रमोद ठाकूर, सुभाष मानमोडे, जगदीश गमे, संजय मांगे आदींनी कन्हैय्या कुमार यांच्याकडून म्हटले जाणारे ‘हमे चाहिए आझादी... भ्रष्टाचार से आझादी... बेरोजगारी से आझादी’ हे गीत डफलीच्या तालावर गाऊन यात्रींचा उत्साह वाढविला.