नागपूर : पासपोर्टसह सर्व कागदपत्रात नाव योग्य असूनही व्हिसात मात्र चुकीचे नाव देण्यात आले. त्यामुळे हज यात्रेच्या ऐन एक दिवसापूर्वी नागपुरातील वृद्ध दाम्पत्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. आज दिवसभर हेे दाम्पत्य व्हिसातील चुका सुधरविण्यासाठी इकडे तिकडे आर्जव करीत होते. वृत्त लिहिस्तोवर त्यांच्या समस्येचे निराकरण झाले नव्हते. दरम्यान, एअरलाईन्सच्या एका अधिकाऱ्याने त्याची चाैकशी करण्यात येईल, असे सांगितले.
राठोड लेआऊटमध्ये राहणारे मोहम्मद उस्मान आणि नैय्यर ७ जूनला हज यात्रेकरूच्या पहिल्या जत्थ्यात रवाना होणार आहे. आज त्यांनी हज कमिटीच्या वेबसाईटवर अपलोड झालेला व्हिसा डाऊनलोड केला. यात पती-पत्नी दोघांच्याही नावात गडबड आढळली. त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. हज यात्री ईकबाल अहमद यांनी सांगितले की, पासपोर्टसह सर्व आवश्यक कागदपत्रांत त्यांचे पूर्ण नाव इकबाल अहमद मोहम्मद उस्मान आणि त्यांच्या पत्नीचे नाव नैय्यर नोंदलेले आहे. मात्र, व्हिसामध्ये उस्मानच्या ठिकाणी उसामा आणि नैय्यरच्या ठिकाणी नैय्यबर असे नमूद आहे.
हेल्पलाईवरही समाधान नाही
इकबाल यांनी सांगितले की त्यांनी सकाळी तातडीने केंद्रीय हज समितीच्या हेल्पलाईनवर कॉल करून व्हिसात चुकीचे नाव आल्याची तक्रार नोंदवली. मात्र, तेथूनही समाधान झाले नाही. नागपुरातील हज हाऊसमध्ये राज्य हज समितीच्या अधिकाऱ्यांनाही ही त्रुटी सांगितली. मात्र वृत्त लिहिस्तोवर या वृद्ध दाम्पत्याबाबत झालेली चूक दुरूस्त झाली नव्हती. व्हिसात चुकीचे नाव आल्यामुळे साैदीत अडचणीचा सामना करावा लागू शकतो, अशी शंका असल्यामुळे हे दाम्पत्य चिंतेत आहे.