नागपूर: सक्करदऱ्यात फॅमिली सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
सक्करदऱ्यातील संगम टॉकीज मार्गावर के.सी.फॅमिली सलून आहे. शीला (३८) नावाची महिला हे सलून चालवते. या सलूनमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली होती. सोमवारी पोलिसांनी खातरजमा केली व सापळा रचून तेथे धाड टाकली. सलूनमध्ये चार तरुणी आढळून आल्या. शीला पैशाचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. तिने गरीब घरातील तरुणी व महिलांना जाळ्यात ओढले होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, अयुब संदे, वैभव बारंगे, अविनाश जायभाये यांच्या पथकाने ही कारवाई केली.