नागपूर : आधीच्या चित्रपटातूनही सामाजिक विषमता अन् गरिबांसोबत होणारे राजकारण दाखविले जात होते. मात्र, त्यात कांगावा नव्हता तर थेट हृदयसंवाद होता, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक अमृत गांगर यांनी केले. द नागपूर प्रेस क्लबतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या 'सत्यजित रे : सिनेमा ॲण्ड पॉलिटिक्स वर्कशॉप'मध्ये ते बोलत होते.
प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी प्रारंभी गांगर यांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला. यावेळी जॉय कोहली विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरीची भूमिका वठविणारे तसेच सत्यजित रे, शाम बेनेगल, शर्मिला टागोरसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांशी निकटता अनुभवणाऱ्या गांगर यांनी आजच्या वर्कशॉपमध्ये सत्यजित रे यांच्या चित्रपटातील राजकारणासोबत कथानक, संगीत, कलावंत, अभिनय याचा अतिशय सुरेख आणि सुलभतेने उलगडा केला. त्या काळात आतासारखे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. मात्र, जे होते, त्या आधारे अस्सल कलाकृती कशी तयार केली जायची, त्याचेही विस्तृत विश्लेषण केले.
लाखो-करोडो नागरिकांना एकाचवेळी साद घालण्याचे, त्यांना योग्य तो मेसेज देण्याचे माध्यम म्हणून चित्रपटाकडे बघितले जाते. मात्र, त्यावेळी मेसेज नव्हे तर हृद्यसंवाद केला जायचा. राजकारण, समाजकारण आजही चित्रपटातून दाखवले जाते अन् त्याहीवेळी दाखवले जायचे. मात्र, त्यात खूप फरक आहे. गावागावांत त्या काळातील राजकारणाची पद्धत कशी होती, उच्चवर्णीय अन् गरिबांमधील संबंध, व्यवहार कसा असायचा, ते त्यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील, ओम पुरी यांनी अभिनय केलेल्या एका चित्रपटाचा काही भाग दाखवून स्पष्ट केले. त्याचे विश्लेषण करताना सामाजिक विषमता आधीच्या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवली जायची, तेसुद्धा पटवून दिले. त्यावेळी कोणताही कर्णकर्कशपणा किंवा भडकावूपणा घुसवला जात नव्हता. त्यावेळी चित्रपटातून एक सहजता दाखवली जायची, असे सांगून त्यांनी काही क्लीपही 'वर्कशॉप'मध्ये उपस्थितांना दाखवल्या.
चित्रपटांचे किस्से, जुन्या आठवणींनाही उजाळाया कार्यशाळेत अनेक चित्रपटप्रेमी जुनी जाणती मंडळी सहभागी झाली होती. सोबतच मोठ्या संख्येत महाविद्यालयीन तरुण-तरुणीही होत्या. त्यांच्याशी संवाद साधताना अमृत गांगर यांनी सध्याच्या पिढीची जुन्या आणि आताच्या चित्रपटाविषयीची मते जाणून घेतली. अनेक किस्से सांगून जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.