नागपूर : गेमींग ॲपमध्ये पैसे गुंतविलेल्या एका डॉक्टरची सायबर गुन्हेगारांनी दहा लाखांनी फसवणूक केली. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्यांतर्गत एक सप्टेंबर ते १० नोव्हेंंबर दरम्यान घडली.
डॉ. नितीन रामकृष्ण काकडे (वय ३९, रा. नेहरूनगर हुडकेश्वर) हे बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सीसीडी कॅफे लक्ष्मीनगर येथे सोशल मिडियावर सर्च करीत होते. त्यांना ओरीस क्वाईनबाबत माहिती मिळाली. त्यांना जाहिरात दिसल्यामुळे त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आरोपी राहुल हरविंदर खुराणा (वय ४५, रा. ई/५७, बेलनगर दिल्ली) आणि तरुण विजयकुमार त्रिखा (वय ४६, रा. देवनगर करोलबाग, नवी दिल्ली) यांना गेमींग ॲपबाबत विचारना केली असता दोन्ही आरोपींनी डॉ. नितीनला कमी वेळात अधिक नफा देण्याचे आमीष दाखविले.
सुरुवातीला त्यांनी डॉ. नितीनला नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डॉ. नितीनने गेमींग ॲपमध्ये १० लाख रुपये गुंतवून आरोपींना नफ्याची रक्कम मागितली. परंतु आरोपींनी टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. नितीन यांनी बजाजनगर पोलिसात तक्रार दिली. बजाजनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.