नागपूर: रामझुल्यावर मद्यधुंद अवस्थेतील महिलेने मर्सिडीज कारने दोन निष्पाप दुचाकीस्वारांवर चिरडत त्यांचा बळी घेतल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले होते. या प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील भाष्य केले आहे. चांगल्या घरातील महिला दारु पिऊन कार चालवते आणि निष्पापांना चिरडते, कुठे आहेत संस्कार या शब्दांत त्यांनी उपभोगी संस्कृतीकडे झुकणाऱ्या प्रवृत्तींबाबत चिंता व्यक्त केली.
संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी ते रेशीमबाग येथे बोलत होते. आपण संस्कार व संस्कृतीच्या गोष्टी करतो. मात्र चांगल्या घरातील महिला कार चालवते व लोकांना चिरडते. कुठे आहे आपले संस्कार व आपली संस्कृती. आपणच संस्कृती वाहक आहोत व आपणच तिची पर्वा करायला हवी. अशा उपभोगी जीवनशैलीकडे झुकलेल्या प्रवृत्तीमुळे नवीन पिढीपर्यंत आपली संस्कृती, विचार, संस्कार पोहोचण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी समाजातील विविध प्रबोधन करणारे लोकांना संयमाचे बंधन आणावे लागेल. सरकारला त्यासाठी तरतूद करावी लागेल, असे सरसंघचालक म्हणाले.
कमीत कमी सिग्नल तरी पाळासमाजाने उपभोगाच्या स्पर्धेत धावण्याची गरज नाही. साधेपणाने राहिले पाहिजे. पिझ्झा खाणे हा नियम बनायला नको. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाकडून देशाच्या कायद्याचे पालन व्हायला हवे. लाल सिग्नलवर वाहन थांबविलेच पाहिजे. करभरणा वेळेवर केला पाहिजे असे सरसंघचालक म्हणाले.
रितीका मालू अद्यापही फरारच, पोलिसांचे हात रिकामेच२५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास रितिका मालूने मर्सिडिज कार भरधाव वेगाने चालवत रामझुल्यावर दोन दुचाकीस्वार तरुणांना मागून धडक दिली होती. त्यात मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) या दोघा मित्रांचा मृत्यू झाला होता. रामझुला अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी रितिका मालू ही अद्यापही पोलिसांच्या हाती सापडलेली नाही. तिच्याविरोधात ‘लूक आऊट नोटीस’ जारी केल्यावरदेखील तिचा शोध लागलेला नाही. २४ मे रोजी तिचे शेवटचे लोकेशन राजस्थान येथील होते. त्यानंतर तिचा फोन स्वीच ऑफ येत आहे.