नागपूर : भाजप-शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे गट) लोकप्रतिनिधींमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याची चर्चा जोरात असताना भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन यांनी सार्वजनिक मंचावरून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांविरोधात त्यांनी उघडपणे बंडाचा झेंडाच उभारल्याची चर्चा आहे. कुठल्याही स्थितीत रामटकेचे आमदार आशीष जयस्वाल यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असे म्हणत त्यांनी वेळ आली तर पक्षातून काढले तरी चालेल अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.
रविवारी जिल्हा भाजपतर्फे पारशिवनी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत शिंदे सेनेचे खा. कृपाल तुमाने व आ. आशीष जयस्वाल हेदेखील यात उपस्थित होते. हे नेते येण्याअगोदर रेड्डी यांचे भाषण झाले. यात त्यांनी त्यांच्या मनातील राग व्यक्त केला. तुमाने आणि जयस्वाल यांना भाजपचे नेते घेऊन चालणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. भाजपच्या उमेदवाराला पाडून आशीष जयस्वाल आमदार झाले. त्यांना महामंडळ देण्यात आले, मात्र माजी आमदार म्हणून मला काहीच दिले नाही. ज्या व्यक्तीने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला त्याच्या मांडीला मांडी लावून नेते बसत असतील तर ते मला मान्य नाही, असे रेड्डी म्हणाले.
जयस्वाल सरकारमध्ये आहेत त्याला माझा विरोध नाही. त्यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून ते आपल्यासोबत आले. मात्र मला त्यांच्यासोबत बसणे मान्य नाही. तुमाने यांनी कधीही भाजपबहुल भागाला खासदार निधी दिला नाही. त्यांना केवळ आपल्याकडून मते पाहिजे असतात, असा आरोपदेखील रेड्डी यांनी लावला. मला पक्षातून काढून टाकले तरी चालेल, असेदेखील रेड्डी म्हणाले.
रेड्डींची वर्तणूक चुकीची : बावनकुळे
दरम्यान, मल्लिकार्जुन रेड्डी यांची वर्तणूक चुकीची होती, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक संपल्यानंतर त्यातील राजकारण विसरून विकासाचे राजकारण करायला हवे. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून जे काही झाले ते चुकीचेच होते. आशीष जयस्वाल व तुमाने आमच्याच विनंतीवरून मंचावर आले होते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या मंचावर जात असतात. अशा वेळी असे बोलणे अयोग्य होते, असे बावनकुळे म्हणाले.